आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इथेनॉल इंधनावर वाहने चालवण्याची तयारी पूर्ण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सांगली, कोल्हापूर परिसरात उसाचे अतिरिक्त उत्पादन होते. या उसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील सहा आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांतील वाहनांची इंधनाची गरज भागेल. त्यासाठी सरकारकडून इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस व आॅटो रिक्षा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते, जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.

येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ए. एस. भोईटे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘विद्यापीठांतून गरिबांना उपयुक्त आणि परवडेल, असे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. कोणत्याही संशोधनात संपत्ती निर्माण करण्याची, समाजाच्या गरजा भागवण्याची क्षमता असली पाहिजे.’

‘या वर्षी साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले. त्यामुळे उसाला दर मिळाला नाही आणि शेतकरी अडचणीत आला. दुसरीकडे साखर कारखानेही साखरेच्या दराअभावी आर्थिक संकटात आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे. कोल्हापूर विभागात ऊस जास्त पिकतो. साखरेचे डिटर्जंट पावडरमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मी ऐकले. उसापासून इथेनॉल निर्मितीवर ब्राझीलने भर दिला आहे. आपल्याकडेही इथेनॉलचे उत्पादन होऊ शकते. कोल्हापूर विभागात तर पश्चिम महाराष्ट्रातील सहा आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांतील वाहनांची इंधनाची गरज भागवण्याची क्षमता आहे.

येथील कारखान्यांनी, शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केल्यास शेतकऱ्यांना चांगला पैसा तर मिळेलच, शिवाय दरवर्षी करावी लागत असलेली ८ लाख कोटी रुपयांच्या इंधन आयातीतही घट करता येईल. त्यासाठी सरकारने सर्व ती धोरणे तयार केली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस लवकरच सुरू होत आहेत, असेही ते म्हणाले.

राजकारण करू नका; संशोधनावर भर द्यावा
‘‘मला अलीकडे विद्यापीठांमध्ये वाढत असलेले राजकारण पाहून वाईट वाटते. खरे तर विद्यापीठांनी मूलभूत संशोधनावर भर देणे अपेक्षित आहे. स्थानिक सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल, असे संशोधन करण्यावर विद्यापीठांनी भर द्यावा,’ असा टोलाही गडकरी यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...