आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jehangir Art Gallery,Latest News In Divya Marathi

तेजस्वीनीच्या चित्रांचे जहाँगीर आर्ट गॅलरीत सोमवार पासून प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- चित्रकलेमध्ये विविध स्तरावर मिळालेली पारितोषिके, तसेच महाराष्ट्र शासनाचा मुद्राचित्रण प्रकारातील राज्य पुरस्कारविजेत्या सोलापूरची सुकन्या तेजस्वीनी सोनवणेच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत सोमवारपासून भरत आहे. या निमित्त तेजस्वीनीच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा. लहान मुलांना सर्वात प्रथम आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे साधन मिळते ते चित्रकला होय. त्यांच्या भावना त्यांना स्पष्टपणे सांगता आल्या नाहीत तरी त्या चित्रातून ते सांगू शकतात. तसेच, समाजातील अनेक गोष्टींविषयी चित्रकलेतून जागृती करता येते. अशा चित्रकलेच्या माध्यमात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तेजस्वीनीने अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत. तेजस्वीनीने अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून जे.डी. आर्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर बॅचलर ऑफ फाइन आर्टची पदवी तिने भारती विद्यापीठ पुणे येथून संपादन केली. तर मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाइन आर्ट तिने पूर्ण केले. ती मुद्राचित्रण म्हणजेच प्रिंट मेकिंग ग्राफिक्स या चित्रकला प्रकारातील कलाकार आहे.
तिला मिळालेली पारितोषिके
महाराष्ट्र शासनाचा मुद्राचित्रण प्रकारातील राज्य पुरस्कार, 54 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात बक्षीस, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने भरवलेल्या 96 व्या कला प्रदर्शनात बक्षीस, युवा कलाकार म्हणून स्कॉलरशिप 2011/12, ऑल इंडिया फाइन आर्ट आणि क्राफ्ट सोसायटी, नवी दिल्लीचे बक्षीस, मुंबई येथे भरलेल्या 52 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सहभाग, 25 व्या लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर ओक, कला प्रदर्शनात बक्षीस, लोटस आर्ट शो, वुमन आई फाऊंडेशनचे बक्षीस, विविध समूह प्रदर्शनात यशस्वीरीत्या सहभाग, स्वतंत्रपणे चित्रांचे प्रदर्शन.