आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिले पत्र, कर्मचाऱ्यांनी घेतले उपोषण मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवण्याचे लेखी पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी दिले. त्यानंतर पाच दिवसांपासून सुरू असलेले उपाेषण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतले.
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी संचालक अरुण कापसे आले होते. त्यांनी उपोषणस्थळीच बँकेचे अध्यक्ष दिलीप माने आणि संचालक संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी त्यांनी पत्र आंदोलकांना दिले. त्यांच्याच हातून सरबत घेऊन उपोषणाची सांगता झाली.

जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेने वेतनवाढीच्या मागणीसाठी या आंदोलनाची हाक दिली होती. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एप्रिलपासून उपोषणास सुरुवात झाली. पहिला दिवस शनिवार दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम झाला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र जिल्हाभरातील शाखांमध्ये काम करणारे कर्मचारी सामूहिक रजा टाकून या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाला.
उपोषण दरम्यान श्री. मोटे यांनी आंदोलकांशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु लेखी पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने जाहीर केली. त्यामुळे संचालकांना यात मध्यस्थी करण्याची वेळ आली होती. उपोषण समाप्त करताना संघटनेचे उपाध्यक्ष महादेव कोळी, राजेंद्र नलवडे, सचिव राजेश गवळी, महेश जाधव, दिलीप पवार, आनंद डांगे, शशिकांत तेलकर, बालाजी राऊत, भारत जगताप, संजय जाधव, सोमनाथ घंटे, हर्षल लोंढे आदी उपस्थित होते.
एकजुटीचा विजय
गेल्या अनेक वर्षांपासून वेतनवाढीचा निर्णय प्रलंबित राहिला. त्याबाबत संचालक मंडळाला वारंवार निवेदने दिली. मेळावा घेऊन मागण्यांची तीव्रता सांगितली. परंतु संचालक अनुकूल नव्हते. शेवटी नाइलाजाने उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. कर्मचारी एकीने त्यात सहभागी झाले. परिणामी संचालकांना निर्णय घेण्यास भाग पाडावा लागला. हा कर्मचारी एकजुटीचा विजय आहे.
मिलिंद शिंदे, संघटनेचे अध्यक्ष
फोटो - सोलापूर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी उपोषण केले. त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे लेखीपत्र सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित कर्मचारी.