आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांच्या पत्रकारितेत परिवर्तनाचे बीज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पत्रकारितेचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च्या आणि इतरांच्या वृत्तपत्रात केलेले लेखन आणि संपादन ही कामगिरी अभूतपूर्व आहे. त्यांची पत्रकारिता समाज परिवर्तनाचे सार्मथ्य लाभलेली पत्रकारिता होती. लेखणीच्या सार्मथ्यातून क्रांती घडू शकते, हे त्यांच्या पत्रकारितेने सिद्ध केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने सतत नवविचारांची पेरणी करण्याचे कार्य केले. त्यांची लेखणी सतत संघर्ष करीत होती. वर्षानुवर्ष मूक राहिलेल्या समाजाने भीड सोडून आरोळी ठोकण्याची हीच वेळ हे त्यांना उमजले. त्यामुळे अध्रे देत नाही तर पूर्ण घेऊ, अशी गर्जना करत 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे पहिले वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केले. ‘मूकनायक’ची जाहिरात प्रसिद्ध करण्यास केसरीने नकार दिल्याचे जगजाहीर आहे. यावरून मूकनायकसारख्या वृत्तपत्रांची वाट किती बिकट होती, हेदेखील यातून जाणवते. मूकनायक फार काळ टिकाव धरू शकले नाही. मात्र, परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले.

24 नोव्हेंबर 1930 रोजी जनता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. हे वृत्तपत्र केवळ दलित जनतेनेच नव्हे तर दलितेतर जनतेनेही वाचावे, अशी त्यांची अपेक्षा होती. यात त्यांनी सर्वसमावेशक विषयांवर लेखन केले. हे वृत्तपत्र 25 वष्रे सुरू होते. विचारांचा पराभव विचारांनीच केला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे सूत्र होते. याच भावनेतून त्यांनी सतत विचारांची लढाई केली.

त्यांच्या लेखन सार्मथ्याविषयी निजाम विजय या वृत्तपत्राने म्हटले होते, ‘लेखकाची भाषा अत्यंत जोरदार सडेतोड व केवळ निभ्रेळ सत्याशिवाय कशाचीही दरकार न करणारी अशी आहे व हेच धोरण पत्रकर्ते जोवर कायम ठेवतील तोवर ते आपले उद्दिष्ट सिद्धीस नेण्याचे यश कायम मिळवतील.’ त्याप्रमाणे खरोखरच डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेने भारतात नवा इतिहास रचण्याचे कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हा जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेती, शिक्षण, सहकार, परराष्ट्र व्यवहार यासह विविध विषयांवर वृत्तपत्रातून लेखन केले. केवळ समाजहितासाठी पत्रकारिता करणारे संपादकही आता नाहीत नि त्यांच्या लेखणीत समाज बदलविण्याचे सार्मथ्यही नाही. एकंदरीत डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठित भारताचे स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे.

बहिष्कृत भारत
‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 मध्ये सुरू केले. सवर्णांनी बहिष्कृत केलेल्या समाजाच्या वेदना डॉ. आंबेडकरांनी या वृत्तपत्रातून व्यक्त केल्या. या वृत्तपत्राला जवळपास तीन वर्षाचे आयुष्य लाभले. या वृत्तपत्राने इतिहासात स्वतंत्र नोंद करून ठेवण्याइतकी महत्त्वपूर्ण होती.