आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाणी न्यायाधीशासह पती, मुलगी अपघातात ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी- सोलापूर येथून गेवराई (जि. बीड) च्या दिशेने निघालेल्या अल्टो कारला कंटेनरने जोराची धडक दिल्याने पती, पत्नीसह लहान चिमुकली असे तिघे ठार झाले. हा भीषण अपघात शनिवारी (दि.13) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास विजोरापाटी (ता. वाशी) येथे घडला असून मृतामध्ये गेवराई येथील सहदिवाणी न्यायाधीशांचा समावेश आहे. हेमलता राठोड (वय 35), डॉ. प्रकाश राठोड (40), इशिता राठोड (वय 6) (सर्व रा. सध्या रा. गेवराई, जि. बीड, मूळ - शंकरनगर ता. दक्षिण सोलापूर) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. हेमलता राठोड या सोलापूरच्या माजी महापौर शेवंताबाई पवार यांच्या कन्या होत. त्या गेवराई (जि. बीड) येथे सहदिवाणी न्यायाधीश होत्या.

राठोड दांपत्य सोलापूर येथून अल्टो कार (एमएच-10-एएन-7871)मधून गेवराईच्या दिशेने जात होते. त्यांची कार उस्मानाबाद जिल्ह्यातील विजोरापाटी (ता.वाशी ) जवळ पोहोचली असता बीड येथून उस्मानाबादच्या दिशेने निघालेल्या कंटेनर (एचआर-55-क्यू-8603) ने समोरून कारला जोराची धडक दिली. यामध्ये कारमधील राठोड दांपत्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या इशिताला तत्काळ वाशी ग्रामीण रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे वाशी रुग्णालयात तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच वाशी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. डी. दराडे, कर्मचारी उद्धव लोमटे व अमर जाधव यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर साहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवाल हेही अपघातस्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह एका खासगी गाडीतून शवविच्छेदन करण्यासाठी वाशी रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.