आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकचे पाणी महाराष्ट्राला मिळेल - सिद्धारामय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कर्नाटकात असणार्‍या भाजप सत्तेने महाराष्ट्राला आलमट्टीचे पाणी न देऊन जी चूक केली ती आम्ही करणार नाही. उलट दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री बसून यावर कसा तोडगा काढता येईल? हे पाहू, असे प्रतिपादन कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केले. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जुळे सोलापुरातील शिवदारे महाविद्यालयात रविवारी आयोजित कार्यक्रमात सिद्धरामय्या यांचा जाहीर सत्कार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व वन व पर्यावरण मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

हर्षवर्धन पाटील (सहकार मंत्री), मधुकरराव चव्हाण (दुग्धविकास मंत्री), व्ही. हनुमंतराव (खासदार, आंध्र प्रदेश), एम. बी. पाटील (जलसंपदा मंत्री), के. विश्वनाथ (खासदार कर्नाटक), शिवानंद गौडापाटील (आमदार, बागेवाडी), राजू अलगूर (आमदार, नागठाण), यशवंतगौडा पाटील (आमदार, इंडी), डॉ. मकबूल बागवान (आमदार, विजापूर),बसवराज भैरगी (आमदार कर्नाटक), एच. रेवण्णा (माजी मंत्री, कर्नाटक) यांच्यासह माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, भारत भालके, महापौर अलका राठोड, विष्णू कोठे, प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले, सेवादलाचे चंद्रकांत दायमा आदी उपस्थित होते.

सिद्धरामय्यांचा परिचय
सिद्धरामय्या हे बालपणी त्यांचे गाव सिद्धरामेश्वरगुंडी येथील श्रीसिद्धरामेश्वर मंदिराचे पुजारी म्हणून काम करीत. त्यांनी थेट पाचवीत प्रवेश घेतला व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शास्त्र शाखेतील व कायद्याची पदवी त्यांनी घेतली आहे. सिद्धरामय्या यांचे कर्नाटकात काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.


गृहमंत्री शिंदे म्हणाले..
महाराष्ट्रात शाहू, फुले व आंबेडकरांनी दीनदलितांसाठी केलेले कार्य खूप मोलाचे आहे, असे सिद्धारामय्या यांनी सांगितले. काँग्रेसने आणलेल्या परिवर्तनामुळे दलितांना न्याय मिळालेला आहे. आलमट्टीच्या पाण्यासंदर्भात सकारात्मक विचार करत आहोत. जादा पाणी देण्यास आमची हरकत नाही. भाजपच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. सिद्धरामेश्वर, स्वामी सर्मथ आणि हुलजंतीच्या महालिंगराया या मंदिरांना प्रत्येकी पाच कोटी रुपये कर्नाटक सरकारकडून देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही सीमावर्ती राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी बसून राज्य विकासाचे जे जे उपाय साधता येतील त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सिद्धारामय्या यांनी केले. ते कन्नड, हिंदीत बोलले.

निवडणुका म्हणजे सर्वच आघाड्या सांभाळाव्या लागतात. बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची भयंकर रेस असते. त्यातूनही सिद्धरामय्या यांच्यासारख्या एका भटक्या जमातीला संधी मिळते ही खूप चांगली घटना मानता येईल.काँग्रेस पक्ष अशा प्रकारची संधी देऊ शकतो. भीमा नदीवरील बंधार्‍यातून काही प्रमाणात पाणी वाया जाते. त्यासंदर्भात नियोजन न झाल्याने सोलापूर जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला होता. पण कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने महाराष्ट्राला पाण्यासाठी नकार दिला होता. आता असे होणार नाही. 81 कोटी लोकांना अत्यल्प दरात धान्य देण्याचे काम काँग्रेसच करू शकते. निवडणुकासमोर येताच भाजप काहीतरी वावटळ उठवतो. मंदिराच्या नावाने मतदारांची बनवाबनवी करण्याचे काम भाजप करीत आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.

कार्यक्रमातील क्षणचित्रे
दुपारी एक वाजता ठरलेला कार्यक्रम दुपारी चारच्या सुमारास सुरू झाला.
कार्यक्रमास 12 हजारांच्या आसपास कार्यकर्त्यांची होती उपस्थिती
स्वागताला होते यारानाची हलगी आणि पानमंगरुळचे ढोलपथक
सेवादलाच्या पांढर्‍या गणवेशधारी कार्यकर्त्यांची दिली मानवंदना
मंचावर मराठी, हिंदी व कन्नड भाषेचा कार्यक्रमादरम्यान संचार होता
प्रचंड उत्साहात झाला सत्कार, दोन्ही राज्यातील मंत्र्यांची हजेरी