कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या असंख्य वारक-यांनी रविवारी चंद्रभागेचे वाळवंटात भजन- कीर्तने केली. ( छाया : राजू बाबर)
पंढरपूर - कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे दोन लाखांहून अधिक वैष्णव भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे.
एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेदेखील सपत्नीक येथे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्या काहीशी रोडावल्याचे दिसत आहे. मंदिर समितीने नियुक्त केलेल्या खास महिला तसेच अन्य जातींमधील पुजारी मंडळींकडून या वर्षी प्रथमच शासकीय पूजेच्या वेळी मंत्रोच्चार व देवाचे पोशाख केले जाणार आहेत. कार्तिकी एकादशीचा सोहळा हाचि देही हाचि डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून रेल्वे, एसटी, खासगी वाहनांमधून दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि सावळ्या विठुनामाच्या जयघोषामुळे पुण्यनगरी असलेली पंढरी भक्तिरसात चिंब झालेली आहे.
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।।
विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा । तुक्या मुखा विठ्ठल ।।
याप्रमाणे शहरातील मठ, धर्मशाळा तसेच वाड्यांमधून आणि चंद्रभागेच्या विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटात भजन, कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग झालेले दिसत आहेत.
महिला पुजा-यांकडून कार्तिकीची पहिल्यांदाच पूजा
मध्यंतरीच्या काळात येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने श्रीविठ्ठल व रुक्मिणीमातेच्या पूजेसाठी खास नेमणूक केलेल्या महिला तसेच विविध जातींमधील पुरुष पुजारी मंडळींकडून प्रमुख यात्रांच्या काळात शासकीय महापूजेच्या वेळी पहिल्यांदाच उपस्थित राहून मंत्रोच्चाराचे विधी व देवाचे पोशाख करण्याची सेवा समर्पित केली जाणार आहे.
चाळीस फुटांवरून मुखदर्शनाची सोय
मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग तसेच शहरातील रस्त्यावर प्रासादिक वस्तू, सोलापुरी चादरी, घोंगडी, फोटोफ्रेम, देवीदेवतांच्या मूर्ती अशा दुकानांमधून भाविकांची गर्दी दिसत आहे. पदस्पर्श दर्शना बरोबरच मंदिर समितीने मुखदर्शनाची चांगली व्यवस्था केलेली आहे. श्री विठ्ठल मूर्तीपासून अवघ्या ४० फुटांवरून एका वेळेस चार ते पाच भाविकांना श्रीविठुरायाचे मुखदर्शन घडत आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना श्री विठुरायाचे व्यवस्थितपणे दर्शन घडत आहे.
अतिक्रमणांना चाप
नगरपालिका आणि पोलिसांनी पंढरीतील रस्त्यांवरील अतिक्रमणास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाविकांची या रस्त्यांवरून चालताना चांगली सोय होऊ लागल्याचे दिसत आहे. यात्रेच्या प्रमुख दिवसांमध्ये शहरातील रस्त्यांवर फेरीवाले तसेच स्थानिक दुकानदारांनी अतिक्रमणे करू नयेत, यासाठी पालिका तसेच पोलिसांच्या वतीने सतत प्रमुख मार्गावरून ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दक्षता घेत आहेत. यात्रेसाठी शहरातील गर्दीच्या भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.