आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाद्वार गोपाळकाल्याने कार्तिक वारीची सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश ।।
काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम ।।
तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीरगाडे ।।
या भावनेतून शेकडो भाविकांनी महाद्वार काल्याचा शुक्रवारी उत्सव ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवला. त्रेता युगात श्रीरामाने बंधू भरत याला, द्वापार युगात श्रीकृष्णाने उद्धवाला तर कलियुगात हरिदास घराण्यातील पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष श्रीपांडुरंगाने पादुका दिल्या. तेव्हापासून आजतागायत पंढरीनगरीमध्ये या आनंद सोहळ्याचा उत्सव महाद्वार काल्याच्या रूपाने साजरा करण्याची परंपरा आहे. या काल्याने कार्तिक वारीची सांगता होते.
पंढपुरातील श्री हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात पुजारी मंडळींकडून हरिदास यांच्या डोक्याला पागोटे बांधण्यात आले. त्या नंतर साक्षात विठूरायाने दिलेल्या पादुका त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आल्या. हा मान संत नामदेव महाराजांच्या वंशजांना आहे. तेथून हा सर्व मेळा नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात पोहोचला. श्रीविठ्ठल मंदिरातील सभामंडपात मदन महाराज हरिदास यांना खांद्यावर घेऊन गरुड मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्या ठिकाणीच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात, माहेश्वरी (खासगीवाले) धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदासवेसमार्गे श्री. हरिदास यांना खांद्यावर घेऊन उपस्थित भाविकांनी पुन्हा काल्याच्या वाड्यात त्यांना आणले. या वेळी पादुका पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी देवघरामध्ये ठेवण्यात आल्या. त्या नंतर त्या पादुकांची आरती होऊन भाविकांना काल्याचा प्रसाद देण्यात आला.
दोनशे हात लांब पागोटे
महाद्वार काल्याच्या वेळी मदन महाराज हरिदास यांच्या डोक्यावर श्रीविठ्ठलाच्या पादुका ठेवून येथील पुजारी मंडळींकडून त्यांच्या डोक्याला जे कापडाचे पागोटे बांधण्यात येत असते. त्याची लांबी सुमारे दोनशे हात लांब इतकी मोठी असते.