आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात 71 लाखांच्या यंत्रांवर मारला डल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काही संघटनांनी विरोध केल्यामुळे सुरू होण्याआधीच बंद पडलेल्या महापालिकेच्या कत्तलखान्यातील 71 लाख रुपयांची यंत्रसामग्री गायब झाली आहे. याबाबतची माहिती दडवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. कत्तलखान्याच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आलेले दोन कोटी रुपये वाया गेले असून, यंत्रांच्या चोरीची माहिती असूनही महापालिका प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही.

हैदराबाद रोडवरील कल्याणी पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस शहराबाहेर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय महापालिकेने 2003-04 मध्ये घेतला. केंद्र सरकारकडून एक कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळाला. बांधकाम पूर्ण होता होता 2008 उजाडले. दरम्यानच्या काळात विविध सामाजिक संघटना, त्या परिसरातील नागरिक आणि कुरेशी समाजाने कत्तलखान्याला विरोध दर्शवला. काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निर्णय महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर रखडलेलेही बांधकाम पूर्ण झाले. यंत्रांसाठी महापालिकेने एक कोटी रुपये खर्च केले. सातारा येथून 71 लाखांचे यंत्र आणण्यात आले. पाण्याची टाकी उभारण्यात आली. घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा मात्र उभारण्यात आली नाही.

काम पूर्णत्वाकडे असताना काही संघटना, नागरिकांनी निदर्शने केली, काहींनी कत्तलखान्यावर हल्ला चढविला. यामध्ये बरेच नुकसान झाले. त्यानंतर त्याच आठवड्यात त्या हल्ल्याचा फायदा उचलत काहींनी कत्तलखान्यातील साहित्य आणि यंत्रे लंपास केली. उरलेले साहित्य महापालिकेच्या स्टोअरमध्ये आणून ठेवल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी लढा देणार
या भ्रष्टाचाराबाबत माहिती नाही. याची चौकशी करणे गरजेचे आहे. उपमहापौर हारुण सय्यद यांनी याबाबत पक्षाच्या बैठकीत काहीच सांगितले नाही. माहिती घेऊन राष्ट्रवादी लढा देईल.’’
-दिलीप कोल्हे, गटनेते, राष्ट्रवादी

पाहणी करून चौकशी
आठ-दहा महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. कत्तलखान्याची आणि महापालिका स्टोअरची पाहणी करून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’
-अजय सावरीकर, आयुक्त

चौकशी करावी
महापालिकेच्या पैशांतून यंत्रे खरेदी करण्यात आली. ती जर चोरीला जात असतील तर ते योग्य नाही. याला जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा. याबाबत चौकशी व्हावी.’’
-रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या

मला माहीत नाही
कत्तलखान्याबाबत मला काहीच माहीत नाही. त्यामुळे आताच काहीही सांगणे कठीण आहे. यंत्रांची चोरी झाली असेल तर प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करू. कारवाई केली जाईल.’’
-अलका राठोड, महापौर

काय म्हणतात आमचे नेते

साहित्याचा पत्ता नाही
कत्तलखान्यातील साहित्य आणि काही मशिनरी चोरीला गेल्यानंतर उर्वरित साहित्य महापालिकेच्या स्टोअरमध्ये जमा करण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, प्रत्यक्षात पाहिल्यानंतर सध्या कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्या साहित्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे त्या साहित्याचीही विल्हेवाट लावली की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

5 वर्षांपासून वेतन नाही
साहित्य आणि यंत्रे गायब झाल्यानंतर कत्तलखान्याच्या देखरेखीची जबाबदारी त्या परिसरातील एका शेतकर्‍याकडे सोपवण्यात आली. त्याला दरमहा पाच हजार रुपये वेतन देण्याचे ठरले होते. पाच वष्रे झाली तरीही त्या शेतकर्‍याला एक रुपयाही देण्यात आलेला नाही.

काटेरी झुडपांचा वेढा
सध्या कत्तलखान्याची सुरक्षा भिंत गायब झाली आहे. तारेचे कुंपणही दिसेनासे झाले आहे. आवारातील फरशा गायब झाल्या आहेत. चारही बाजूंनी काटेरी झुडपांचा वेढा पडला आहे.

चौकशी समिती नेमण्याची गरज
कत्तलखान्यात आता फक्त टेबल आणि फिटिंग साहित्य आहे. यंत्रे व इतर साहित्याबाबत विचारले असता, महापालिका प्रशासन साहित्य व यंत्रे चोरीला गेले नसून ते आहेत, असा दावा करीत आहे. चौकशी समिती नेमल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.

कोट्यवधी पाण्यात
यंत्रसामग्री बसवल्यानंतर कत्तलखान्यावर सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे होते. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे यंत्रे चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. इतके नुकसान होऊनही महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे गांभीर्य नाही, असे दिसून येत आहे.
आवताडेंकडून माहिती दडवण्याचा प्रयत्न
कत्तलखान्याबद्दल माहिती देण्यासाठी जाणीपूर्वक वरिष्ठांचे नाव पुढे करून संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. माहिती दिली की पितळ उघडे होईल आणि नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल, या भीतीमुळेच असा प्रकार केला जात असल्याचा संशय आहे.

उपमहापौरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
उपमहापौर हारुण सय्यद यांना या भ्रष्टाचाराची माहिती मिळताच त्यांनी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांना अनेकवेळा निवेदन देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सय्यद यांच्या या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही.

हैदराबाद रोडवरील कल्याणी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस बांधलेल्या कत्तलखान्यातील यंत्रसामग्री गायब झालेली आहे. बांधकामही अर्धवटच राहिलेले आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेला कत्तलखाना आता बेवारस आहे.