आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेल्या सहा वर्षीय संकेतचा मृतदेह घराजवळ आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - तीन दिवसांपूर्वी शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथून अपहरण झालेल्या संकेत शरद आटकळे (वय 6) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच्या घरापासून सुमारे 500 फूट अंतरावर उसाच्या फडात आढळला. रस्त्याच्या कडेला पडलेला एक तुटका हात पाहून ग्रामस्थांनी उसाच्या फडाची पाहणी केली, त्यावेळी सडलेल्या अवस्थेत संकेतचा मृतदेह आढळला. या प्रकारामुळे शेगावदुमाल्यावर शोककळा पसरली. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दोघांवर संशय
लाल रंगाची साडी परिधान केलेली एक 35 वर्षीय महिला किंवा जुने टायर घेण्याकरिता खाकी कपडे घातलेला जीप चालक या दोघांपैकी एकाने संकेतचे अपहरण केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. या दोघांचा शोध सुरू आहे.

मृतदेह पाहून चुलते बेशुध्द
ग्रामस्थांनी गेले दोन दिवस परिसरात फिरून संकेतचा शोध घेतला होता. उसाच्या शेतातील प्रत्येक सरी पाहिली होती. शुक्रवारी सकाळी घराजवळच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. संकेतचा मृतदेह पाहून त्याचे चुलते बालाजी आटकळे बेशुध्द झाले. संकेतच्या आई-वडिलांची अवस्था अतिशय कठीण झाली होती. संकेतच्या अपहरणामुळे काल झालेला पोळा सण शेगावदुमाला ग्रामस्थांनी साजरा केला नव्हता.

डावा हात होता धडापासून वेगळा
मंगळवारी (दि. 3) दु. 1 च्या सुमाराला आपल्या घरासमोर खेळणार्‍या संकेतचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी त्याचे वडील शरद आटकाळे (वय 26) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती. मुलाचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी घरापासून अगदी चारशे ते पाचशे फूट अंतरावर उसात सडलेल्या अवस्थेत संकेतचा मृतदेह आढळला. पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्या नंतर वैद्यकशास्त्र चाचणीसाठी तो सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.