आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची पंढरीतील पूजा रोखू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्य शासनाने अनुसूचित जमात व तत्सम जमात बांधवांच्या जात पडताळणी संदर्भात काढलेले अन्यायकारक परिपत्रक आषाढी एकादश्रीपूर्वी रद्द करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. या वेळी समितीने ही भूमिका घेतली.

चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना मागण्यांचे निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

साईनाथ अभंगराव म्हणाले, ‘‘ 18 मे रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अनुसूचित जमात व तत्सम जमात बांधवांच्या जात पडताळणी संदर्भात काढलेले परिपत्रक अन्यायकारक आहे. 15 जून 1995 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या महादेव कोळी समाजातील लोकांची जात पडताळणी झाली नसल्यास त्यांनी आरक्षित जागेवरील हक्क सोडावा. सन 1995 नंतरच्या सेवेतील समाजबांधवांना 31 जुलैपूर्वी जात पडताळणी करून घ्यावी. त्या अन्यायकारक परिपत्रकात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना जात पडताळणी सक्तीची केली असून त्याबाबतचा दाखला न दिल्यास त्यांचे निवृत्तीवेतन बंद करण्याचा इशारा दिला आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वीच ते अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी येऊ देणार नाही, असा इशारा अभंगराव, अरुण कोळी व गणेश अंकुशराव यांनी दिला.

प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये कोळी समाजाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रसेचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी निवेदन स्वीकारले. काँग्रेस भवनमध्ये आमदार दिलीप माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. पावसाळी अधिवेशनामध्ये परिपत्रकाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मोर्चामध्ये संजीवकुमार कोळी, गणेश कोळी पंचप्पा हुग्गे, प्रा. अशोक निंबर्गी,अविनाश कोळी, संजय कोळी, कपिला कोळी, कमलताई ढसाळ, भारती कोळी, नागेश बिराजदार, सुधाकर सुसलादी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चा स्थळाला भेट देऊन आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी पाठिंबा दिला.

या होत्या मागण्या
जातीचा दाखला देताना 1950 पूर्वीची अट शिथिल करावी
जात पडताळणी समितीवर उच्च् न्यालयातील निवृत्त किंवा जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करावी
मच्छिमार बांधवांना पावसाळ्यामध्ये उदनिर्वाहभत्ता द्यावा
वयोवृद्ध मच्छिमार बांधवांना पेन्शन योजना सुरू करावी