आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारी गंगूबाई आता येणार रुपेरी पडद्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्वप्रथम मालिका आणि नंतर त्याचविषयावरचे नाटक अशा दोन्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसविणारी तसेच सामाजिक विषयांना हात घालणारी ‘गंगूबाई आणि छू’ ही लोकप्रिय जोडगोळी आता मोठय़ा पडद्यावर येत आहे. 27 सप्टेंबरपासून कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा तुफान गाजल्या होत्या. समाजातील लोकांना येणार्‍या अडचणी गंगूबाई आपल्या स्टाईलने सोडवायच्या. गंगूबाईचा हजरजबाबीपणा आणि धाडसी कामगिरी यामुळे ही दोन्ही पात्रे प्रेक्षकांच्या मनात बसली आहेत. यावरच व्हायकॉम 18, मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि विद्याधर पाठारे यांच्या आयरिस प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती आहे.

आनंद इंगळे, ज्योती जोशी, नागेश भोसले यांच्याही चित्रपटात भूमिका असणार आहेत. राजेश देशपांडे यांचे लेखन आहे. शैलेंद्र बर्वे यांचे संगीत आणि अवधूत गुप्ते, नेहा राजपाल, विवेक नाईक आणि चेन्नई एक्स्प्रेसमधील ‘वन टू, थ्री फोर’ गाणं गाणारी हंसिका यांचे पार्श्वगायन आहे. नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार आणि राजेश बिडवे यांचे आहे. छायांकन संजय जाधव यांचे आहे.

माझे स्वप्न साकार झाले
गंगू आणि छूने सर्वांच्या मनात घर केले होते. प्रत्येक गुरुवारी येणार्‍या मालिकेची सर्वजण वाट पाहायचे. त्या आठवड्यात देशभरात झालेल्या मुख्य घटनेवर आधारित भाग असायचा. महिलांनी कोणत्याही गोष्टीसाठी स्वत:ला कमी लेखू नये व प्रत्येक गोष्टीत पुढाकार घ्यावा हा उद्देश आहे. 300 भाग, सलग 6 वष्रे चालण्याचा विक्रम आहे.
- निर्मिती सावंत, नायिका

कशाचाच वास नाही
मालिका, नाटक यापेक्षा पूर्णत: वेगळा चित्रपट करण्याचा प्रयत्न आहे. नाटक व मालिकेचा वासही याला नाही. केवळ पात्रे, नावे व माहिती असलेले कथानक यात आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय आहे. जसा प्रत्येकजण मी अण्णा हजारे म्हणून उभा राहिला होता तसेच हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येक महिला मी गंगू म्हणून उभारेल.
- राजेश देशपांडे, दिग्दर्शक