आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना महाराष्ट्राची जीवनवाहिनी संबोधले जाते. सोलापूर एसटी आगाराने ग्रामीण भाग जोडला आहे. पण, प्रवाशांची वाढती संख्या पाहता सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर मोठा ताण आहे. मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांच्या दृष्टीने अपुरे आहे. दुसरीकडे कुमठा नाका येथील बसस्थानक धूळ खात आहे. परिणामी बसस्थानक तसेच प्रवाशांवर ताण वाढत आहे.
आज सोलापूर शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या घरात पोहचली आहे. तीर्थटन, पर्यटन व तीन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर शहरातून जातात. त्यामुळे शहरातील वर्दळ वाढलेली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली एसटी नियोजनात मात्र मागे असल्याचे चित्र आहे. 1996 मध्ये एसटी प्रशासनाने जुळे सोलापूर, पूर्व भाग, कुमठा नाका आदी भागांत राहणार्या प्रवाशांसाठी कुमठा नाका येथे बसस्थानक क्रमांक 2 उभारले. त्यासाठी एसटी प्रशासनाने 2.46 हेक्टरची जागा ताब्यात घेतली. बाजारभावाने आज त्याची किंमत कोट्यवधी आहे. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकावरचा ताण हलका व्हावा आणि कुमठा नाका परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, या हेतूने बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, आजही जागेचा वापर केवळ रात्रीच्या वेळी गाडी थांबवण्यासाठी करण्यात येत आहे. नियोजन नसल्याने प्रशासनावरचा ताण तर वाढतच आहे. शिवाय प्रवाशांना मिळणार्या सुविधांमध्ये अभाव आहे.
समस्यांचे आगार
कुमठा नाका बसस्थानक अंतर्गत रस्ते पूर्णपणे खराब झाले. आत आणि बाहेरील प्रवेशद्वारजवळ मोठे खड्डे आहेत. परिणामी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणावर डबके साचते. चालक व वाहकांना राहण्यासाठी केवळ नावालाच विर्शांती कक्ष आहे. या ठिकाणी पिण्याची पाण्याची विशेष व्यवस्था नाही. प्रवाशांना कूपनलिकेचे पाणी प्यावे लागते. तसेच बसस्थानकाच्या संरक्षण भिंती ठिकठिकाणी फोडण्यात आल्या आहेत.
पुणे नाका येथील जागा प्रकरण न्यायालयात
जुना पुणे नाका येथे एसटी प्रशासनाने नूतन बसस्थानक बांधायचे म्हणून 3 एकर 24 गुंठे जागा 24 नोव्हेंबर 1992 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकत घेतली. मात्र, सध्या हे प्रकरण मुंबई उच्च् न्यायालयात असल्याने एसटी प्रशासन आजही ‘वेट अँन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. परिणामी आजही प्रवाशांना सक्षम बसस्थानकाची वाट पहावी लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात या आहेत समस्या
अंतर्गत रस्ते पूर्णपणे खराब आहेत. आत आणि बाहेरील प्रवेशद्वारजवळ मोठे खड्डे. परिणामी पावसाळयात मोठय़ा प्रमाणावर डबके साचते. इमारतीच्या छतांवर जागोजागी खड्डे. चालक व वाहकांना राहण्यासाठी केवळ नावालाच विर्शांती कक्ष . प्रवाशांना पिण्यासाठीचे कूपनलिकेचे पाणी. महानगरपालिकाचा नळ नाही.
वाहतूक सुरू करणार
मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी 80 लाखांची कामे अपेक्षित आहे. यातील 20 लाखांचा निधी मंजूर आहे. यातून बसस्थानकातील रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. तर उर्वरित 60 लाखांच्या कामातून बसस्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत. कुमठा नाका बसस्थानक येथून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे ठरले आहे. त्यासाठी आवश्यक असणार्या सुविधा बांधकाम विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.’’ शशिकांत उबाळे, विभागीय अभियंता, राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग.
चांगली सेवा देण्याचा प्रयत्न
सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाची जागा अपुरी आहे. तसेच येथे अन्य समस्या आहेत. जुना पुणे नाका येथे असणारी जागा वादात आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाचा बीओटी तत्त्वावर विकास करायचा की अन्य जागेतून एसटीची वाहतूक सेवा सुरू करायची. या विषयी येत्या महिनाभरात निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकर तोडगा काढून प्रवाशांची चांगली सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’ जीवनराव गोरे, अध्यक्ष, परिवहन महामंडळ . मुंबई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.