आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाचे फोटो काढणा-याला जमावाकडून चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कर्तव्यावर उभारून थक लेल्या महिला कॉन्स्टेबल हातगाड्यावर नाष्टा करीत असताना त्यांचे गुपचूप फोटो काढणा-या दोघा भामट्यांना सदरील कॉन्स्टेबलसह जमलेल्या जमावाने चांगलाच चोप दिला. हा प्रकार शुक्रवारी (दि.4) दुपारी 3 वाजेच्या सुमारास न्यायालयाशेजारील सिग्नलजवळ घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नलवर वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांच्या मदतीला महिला पोलिस कर्मचारी देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कोर्टाजवळील सिग्नलवर कर्तव्यावर असणारी एक महिला पोलिस कर्मचारी जवळच असणा-या हातगाड्यावर शुक्रवारी दुपारी नाष्टा करीत होती. नाष्टा करण्यासाठी दोन तरुणही तेथे आले. दोघापैकी एकाने महिला कॉन्स्टेबलचा मोबाइलमध्ये गुपचूपपणे फोटो काढला. ही बाब काही वेळाने सदरील महिला कॉन्स्टेबलला समजल्यावर प्रथम तिने मोबाइल ताब्यात घेऊन तपासला असता त्यामध्ये तिचा फोटो आढळून आला. यामुळे संतापलेल्या त्या कर्मचा-याने दोन्ही तरुणांना जाब विचारत, कानशिलात लगाविण्यास प्रारंभ केला. हा प्रकार पाहून जमाव जमा झाला. त्यांनीही घडला प्रकार कळताच या दोन्ही तरुणांना चोप देण्यास प्रारंभ केला. यावेळी त्यांच्याजवळील मोबाइलही ताब्यात घेण्यात आले. परंतु, याचवेळी कोणाचा तरी शिफारशीसाठी फोन आला आणि त्या भामट्यांना कोणतीच कारवाई न करता सोडून देण्यात आले.

पोलिस कर्मचा-यांवरच वेळ
शहरात शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणींचे अशा प्रकारे फोटो काढण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा प्रकरणात पोलिसांनी तसेच महिला छेडछाडविरोधी पथकानेही काही हिरोगिरी करणा-यांना चांगलाच चोप देऊन कारवाया केल्या. परंतु, शुक्रवारी दुपारी थेट खाकी वर्दीतील महिला कर्मचा-याचाच फोटो घेण्याचा प्रकार घडल्याने अशा भामट्यांवर कडक कारवाईऐवजी त्यांना सोडून द्यावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोन्ही तरुण चालक
या प्रकरणात मार खाल्लेले दोन्ही तरुण एका उद्योग समूहाच्या वाहनावर चालक असल्याचे कळते. मार भेटल्यानंतर या दोघांनीही गयावया करून माफी मागण्यास प्रारंभ केला.

कारवाई न करताच सोडले
या दोन्ही तरुणांना चोप दिला जात असताना दुसरीकडे या दोघांना वाचविण्यासाठी तत्काळ हालचाली झाल्या. काही फोनाफोनीनंतर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना सोडून दिल्याचे कळते.