आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - लक्ष्मी मार्केट-सिद्धेश्वर पेठ ते विजापूर वेस रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथक, मंडई विभाग आणि वाहतूक शाखा अशा संयुक्त पथकाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. हा रस्ता वाहनांसाठी दिवसभर खुला होता. पण, सायंकाळी पुन्हा काही ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली होती.
बस स्थानक, रेल्वे स्टेशन, विजापूर वेस, 70 फूट रोड परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर वाहतूक शाखेचे साहाय्यक आयुक्त मोरेश्वर अत्राम यांनी लक्ष्मी मार्केट येथील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला. हे करताना पूर्वी काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. मंगळवारी लक्ष्मी मार्केट परिसरातील 17 पत्र्याचे शेड आणि चार ते पाच कठडे काढले. त्यामुळे तो रस्ता मोकळा झाला. सायंकाळी नागरिकांना रहदारीसाठी अडचण आली नाही. अतिक्रमण काढण्याची मोहिम सातत्याने सुरु आहे.
अतिक्रमण झाल्यास पुन्हा मोहीम राबवली जाणार
लक्ष्मी मार्केट परिसरात अतिक्रमण जास्त असल्याने पालिका व वाहतूक शाखेतर्फे मोहीम घेतली होती. तेथील भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यात आली. पुन्हा अतिक्रमण झाल्यास पुन्हा काढण्यात येईल.’’ बी. बी. भोसले, अतिक्रमण प्रतिबंधक विभागप्रमुख
अतिक्रमण मोहिमेच्या कारवाईत सातत्य राहील
शहरातील अतिक्रमणे हटविल्याने रहदारीतील अडथळे दूर होतील. गर्दीच्या ठिकाणची अतिक्रमणे काढत आहोत. त्यात सातत्य राहील. लक्ष्मी मार्केट येथील विक्रेत्यांना महिन्यापूर्वीच मोहिमेची माहिती दिली होती. त्यांनी सहकार्य केल्याने अतिक्रमण काढणे शक्य झाले.’’ मोरेश्वर अत्राम, साहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, सोलापूर
अतिक्रमण मोहिमेनंतर होते पुन्हा अतिक्रमण
70 फूट रोड : येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. पण, पुन्हा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
रेल्वे स्टेशन परिसर : आठ दिवसांपूर्वी येथे मोहीम राबवण्यात आली होती. आता पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती आहे.
लक्ष्मी मार्केट परिसरात मंगळवारी सकाळी अतिक्रमण काढताना महापालिकेचे कर्मचारी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.