आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमणी पाडण्यास स्थगिती द्या; पालिका न्यायालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवरील चिमणीचे पाडकाम विनापरवाना सुरू आहे. त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत महापालिका प्रशासनाने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यावर शुक्रवारी न्यायदंडाधिकारी कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

महापालिकेच्या मनाई नोटिसीला, पोलिसांत दिलेल्या फिर्यादेला जुमानता ‘चिमणी’चे पाडकाम ‘इंद्र्रधनु’चे प्रकल्पाचे संचालक विनय आपटे यांच्याकडून सुरू ठेवले आहे. त्यांच्यापुढे महापालिकेसारखी यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहे. आपल्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेसारख्या यंत्रणेला चक्क न्यायालयात दाद मागावी लागत आहे.
प्रकल्पास बांधकाम परवाना देताना ‘वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे’ही अट होती. त्यामुळे पाडकाम थांबवण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल, असे आयुक्त बुधवारी म्हणाले होते. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

भावनेच्या आधारावर कामकाज नको : दोशी
आयुक्तांनी केवळ नागरिकांच्या भावनेचा विचार करू नये. महापालिकेने ‘इंद्रधनु’च्या बांधकामाला परवाना देताना चिमणीच्या आयुमर्यादेचा विचार करणे गरजेचे होते. तांत्रिक पाहणी करून धोका किती आहे याचा अहवाल तयार केला पाहिजे होता. लोकांच्या भावनांना प्राधान्य देणार की दिलेला परवाना महत्त्वाचा वाटतो, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विद्याधर दोशी यांनी आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांना दिले आहे.

सरकारी वकिलांशी सल्लामसलत
महापालिकेने फिर्यादीत जे कलम सुचवले आहेत, त्यानुसार आम्ही वरिष्ठ सरकारी वकिलांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतोय. यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा ठरवली जाईल.” सूर्यकांतपाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी पोलिस ठाणे

चिमणी ताब्यात घेण्याचा होता पर्याय
चिमणीपाडण्याचा पहिला प्रयत्न २०१२मध्ये झाला होता. त्यावेळी तो रोखण्यात यश आले. जतन करण्यासाठी चिमणी आणि त्याचा परिसर महापालिकेने ताब्यात घेण्याचा पर्याय होता. मात्र, महापालिकेने त्या दिशेने काहीही केले नाही.

आपटेंकडून कॅव्हेट दाखल
महापालिकान्यायालयात धाव घेणार असल्याचा अंदाज आल्याने ‘इंद्रधनु’चे संचालक आपटे यांनी कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे महापालिकेने गुरुवारी दाखल केलेल्या अर्जाच्या मागणीप्रमाणे स्थगिती मिळू शकली नाही. शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आपटे यांच्या वतीने अ‍ॅड. अतुल कस्तुरे काम पाहत आहेत. महापालिकेकडून अ‍ॅड. रघुनाथ दामले बाजू मांडणार आहेत.

न्यायालयात दाद
चिमणी प्रकरणी आम्ही न्यायालयात गेलो असून, त्यामुळे त्यावर सविस्तर सांगता येत नाही. शुक्रवारी सुनावणी आहे.” विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त

वकिलांचा घेतोय सल्ला
महापालिकेकडून कुठली कारवाई करावी याबाबत ज्येष्ठ वकिलांशी चर्चा सुुरू आहे. तसेच न्यायालयाच्या माध्यमातून पाडकामाला स्थगिती मिळवत आहोत.” लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगर अभियंता, महापालिका

पुढे वाचा, पाडकामासाठी आला होता अर्ज, मुदतीत दिले नाही उत्तर....