सोलापूर - देगाव रोडवरील ‘इंद्रधनु गृहप्रकल्प’ आवारात पूर्वाश्रमीच्या लक्ष्मी विष्णू मिलच्या चिमणीचे सुरू असलेले पाडकाम मंगळवारी सकाळपासून तूर्त थांबले. दरम्यान, चिमणी ही ऐतिहासिक वास्तू नसल्याने पाडकामासाठी पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असा दावा इंद्रधनु गृहप्रकल्पच्या वतीने अल्हाद
आपटे यांनी केला आहे. मनपाने दाखल केलेली फिर्याद रद्द करण्याची मागणी पोलिसांकडे त्यांनी केली आहे.
चिमणीचे बांधकाम धोकादायक असून, ती पाडण्याची परवानगी इंद्रधनुच्या संचालकांनी महापालिकेकडे केली होती. अनेकवेळा पत्रव्यवहारही केला. नंतर संचालकांनी मे. चिरायु कन्स्ट्रक्शन कन्सल्टंटकडून सर्वेक्षण करून घेतले, त्याचे प्रमाणपत्र महापालिकेला दिले. अर्ज दाखल केल्यापासून ६० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते. अर्जावर मनपाने कसलीच कार्यवाही केल्याने नियमानुसार मानीव परवानगी आहे, असे समजले जाते. त्यामुळे चिमणीचे पाडकाम हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ महाराष्ट्र प्रांतिक नगर रचना कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार योग्य आहे. पालिकेने हेरिटेज कमिटी स्थापन केली नाही, त्यामुळे चिमणीच्या वास्तूला ऐतिहासिक वास्तू म्हणता येणार नाही.
हेरिटेज वास्तू देखभाल-दुरुस्ती संवर्धनाबाबत अद्याप कोणतीही नियमावली नाही. अशा स्थितीत पाकिलेने फिर्यादीमध्ये घेतलेले आक्षेप चुकीचे असून, ती फिर्याद रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांना दिले. निवेनासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्याची माहिती अल्हाद आपटे यांनी दिली.
नागपूरच्या चिमणीचा दस्तूर नागपूर येथील मॉडेल मिलची जुनी चिमणी पाडल्याबाबत विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न २०१० मध्ये उपस्थित झाला होता. ही इमारत हेरिटेज सूचीमध्ये नसल्यामुळे संबंधितावर कार्यवाही करता येत नाही, असा खुलासा पुरातत्त्व विभाग संचालकांनी केल्याची प्रतही निवेदनासोबत दिली आहे.
सायंकाळपर्यंतची पांढरी रिंग सकाळी दिसली नाही
सोमवारी दिवसभर चिमणीचे पाडकाम सुरू होते. चिमणीचे पाडकाम केल्यामुळे सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमाराला फौजदार चावडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. साडेसहा वाजण्याच्या सुमाराला पोलिसांनी इंद्रधनुच्या संचालकांची भेट घेऊन चिमणीचे पाडकाम बंद करण्याची सूचना केली. सोमवारी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला पाहिले असता चिमणीची दुसरी पांढर्या रंगाची रिंग सहिसलामत दिसली होती. परंतु मंगळवारी सकाळी पाहिले असता ती रिंग नसल्याचे दिसून आले. मात्र, मंगळवारी दिवसभर चिमणीचे पाडकाम बंद होते.