आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी-विष्णू'च्या चिमणीचे पाडकाम सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "इंद्रधनु"प्रकल्पाच्या संचालकांनी "लक्ष्मी-विष्णू'च्या चिमणीचे पाडकाम सुरू केले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या भेटीनंतर रविवारी दुपारी चिमणीचे पाडकाम तात्पुरते थांबले. परंतु ही चिमणी ऐतिहासिक नसल्यामुळे अाणि जीर्ण झाल्यामुळे पाडणे गरजेचे असल्याची भूमिका गृहप्रकल्पाचे संचालक नितीन आपटे यांची आहे. दरम्यान चिमणीचे पाडकाम सुरूच आहे.

गृहप्रकल्प सुरू झाला तेव्हापासून आजतागायत त्या चिमणीला हात लावता प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. गेल्या पाच दिवसांपासून चिमणीचे पाडकाम सुरू आहे. याची माहिती मिळताच आमदार प्रणिती शिंदे या रविवारी दुपारी तेथे पोहोचल्या. तज्ज्ञांकडून चिमणीची पाहणी होत नाही तोपर्यंत पाडकाम थांबवावे, अशा सूचना केल्या.

शंभरवर्षांपूर्वीची चिमणी : चिमणीसुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी, उंची २४० फूट, गोलाई रुंदी ३० फूट, याचे बांधकाम लोड बेअरिंग पद्धतीचे, बाहेरून दगडी, आतून विटांचे बांधकाम.

बैठकीत दोघांची भूमिका ठाम : चिमणीपाडण्यासंदर्भात कागदोपत्री पुरावे घेऊन नितीन आपटे यांनी रविवारी रात्री आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. चिमणी सोलापूरच्या गिरण गावची ओळख आहे त्यामुळे तिचे जतन करा, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. तर इमारत जीर्ण झाली असून, धोकादायक झाली आहे. तसेच ती ऐतिहासिक नाही, पाडणे गरजेचे आहे, असे मत नितीन आपटे यांनी व्यक्त केले. मात्र तोडगा निघाला नसल्याची माहिती आपटे यांनी दिली.

महापालिकेने सायंकाळी दिली नोटीस : लक्ष्मीविष्णू मिलची असलेली चिमणी ही ऐतिहासिक असून हे पाडण्यासाठी महापालिकेची आणि पुरात्तत्व विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. चिमणी पाडण्यासाठी वापरण्यात आलेला परंचा ताबडतोब काढावा, पाडकाम थांबवावे आणि काढलेल्या चिमणीचे अवशेष तेथेच ठेवावे, अन्यथा फौजदारी कारवाई करू, अशा अाशयाची नोटीस महापालिकेने ‘इंद्रधनू’च्या संचालकांना सायंकाळी दिली.

अशा तांत्रिक अडचणी
महापालिकेने अद्याप हेरिटेज कमिटी स्थापन केली नाही. ऐतिहासिक वास्तू जाहीर करण्याचा अधिकार "हेरिटेज कमिटी’चा असतो. कमिटीच नाही तर त्या वास्तूला कोण ऐतिहासिक म्हणणार असा मुद्दा उपस्थित होतो. हेरिटेज कमिटीमध्ये कोण कोण सदस्य हवे याची नियमावली शासनाने निश्चित केली आहे. हेरिटेज कमिटी स्थापन केल्यानंतर ज्या खासगी जागेत ऐतिहासिक वास्तू असते त्या जागामालकास नोटीस द्यायला हवी. ती पाडण्यासंदर्भात हरकती मागवल्या जातात. यानंतर ती कमिटी निर्णय घेऊन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवून देते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अद्याप हेरिटेज कमिटी स्थापन केली नाही आणि आता चिमणीला ऐतिहासिक कुठल्या आधारे म्हणत आहेत?. असा मुद्दा ‘इंद्रधनू’चे नितीन आपटे यांनी उपस्थित केला.

चिमणी ही जरी ऐतिहासिक नसल्याचे अजून जाहीर झाले नसले तरी या वास्तूला सोलापूरची ओळख म्हणून जतन करावे. गरजेनुसार महापालिकेने डागडुजी करावी. अमोल चाफळकर, आर्किटेक्चर

सोलापूरची ओळख म्हणून जतन करावी
सोलापूरच्या गिरणगावची ओळख असलेली चिमणीची वास्तू आहे. ती जतन करणे प्रत्येक सोलापूरकराचे कर्तव्य आहे. ही वास्तू पुरातत्व विभागाकडे येत नाही. मनपाने याचा सांभाळ करायला हवा. इन्टॅक संस्थेच्या माध्यमातून ती वास्तू जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मायापाटील, उपसंचालिका, राज्य पुरातत्व विभाग

- आम्ही शनिवारी चिमणी पाडण्याच्या सूचना केल्या. परंतु कोणी ऐकायला तयार नाहीत. नोटीस देऊ. यावर जरी पाडकाम थांबले नाही तर पुढील कारवाई करू. चलवादी,प्रभारी नगर अभियंता

चिमणी पाडू देणार नाही
लक्ष्मीविष्णू मिलच्या जागेत असलेली चिमणी ही सोलापूरची ओळख आहे. त्याची डागडुजी करू, परंतु पाडू देणार नाही. महापालिकेने योग्य ती कारवाई करून चिमणीचा सांभाळ करावा. प्रणिती शिंदे, आमदार

चिमणी जीर्ण झाली आहे म्हणून पाडतोय
मनपाची ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या जतन करावयाच्या नियमावलीस अद्याप शासनाची मान्यता नाही. म्हणून विकास नियंत्रण नियमावलीत ती समाविष्ट नाही. जी इमारत अद्याप ऐतिहासिक आहे हे जाहीर झाले नाही त्यास महापालिका कुठल्या अर्थाने ऐतिहासिक म्हणत आहे. तसेच ही जागा आमच्या मालकीची आहे त्यामुळे तेथे काय करावे तो आमचा प्रश्न आहे. चिमणी पाडण्यासंदर्भात महापालिकेशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु चर्चा, बैठका, बोलणे या पलीकडे काहीच झाले नाही. यावर महापालिकेने एकही ठाम निर्णय घेतला नाही. त्यामुळे चिमणी पाडण्यास विरोध करायचा अधिकार महापालिकेस नाही. कोणीही चर्चेस यावे, माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. चिमणीचे बांधकाम जीर्ण झाले असून, त्याचे बांधकाम लोडबेअरिंग प्रमाणे आहे. आतून त्याला चिरा पडल्या असून, अपघात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून ते पाडणे गरजेचे आहे आणि मला ते पाडावेच लागेल. - नितीन आपटे, प्रकल्प संचालक इंद्रधनु