आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणार; कल्याणराव काळे यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- उत्पादनवाढीसाठी माती, पाणी, पिकांची पाने, देठ यांचे परीक्षण गरजेचे आहे. त्यासाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांची सोय होईल.
तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या समन्वय सभेत कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी ही माहिती दिली. ऊस लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगून काळे म्हणाले, उत्पादन वाढीसाठी जैविक, सेंद्रीय, रासायनिक व हिरवळीची खते, स्वच्छ व निरोगी बेणे आणि ठिबक सिंचन गरजेचे आहे. त्याकरिता पुढील लागवड हंगामात कारखाना शेतकर्‍यांना उधारीने त्रिस्तरीय पद्धतीनुसार तयार केलेले बेणे व रोपांचा पुरवठा करणार आहे. तसेच कारखान्याकडून 2012-13 गाळप हंगामासाठी खोडवा ऊस असलेल्या शेतकर्‍यांना खतांचे वाटप करण्यात येत आहे. सभासद व बिगर सभासदांना याचा लाभ मिळणार आहे. 1 ऑगस्टपासून प्रतिएकरी तीन पोती युरिया, 10:26:26, तीन पोती सेंद्रीय खत देण्यात दिले जात आहे. एकूण 9001 एकर क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे उधारीवर खतवाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. या सभेस कारखान्याचे उपाध्यक्ष गोरख ताड, कार्यकारी संचालक माणिकराव जगताप, सचिव बाळासाहेब गाजरे, मुख्य अभियंता गणपत घाडगे, मुख्य लेखापाल कैलास कदम, मुख्य रसायनतज्ज्ञ अशोक मेमाने, ऊस विकास अधिकारी एस. एस. काझी उपस्थित होते.
कारखान्याने ठिबक सिंचन संच पुरवण्यासाठी जैन इरिगेशन कंपनीचा अधिकृत विक्रेत्याचा परवाना घेतल्याचे त्यांनी सांगितले. उधारीवर ठिबक सिंचनाचेही वाटप करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थिती व त्यातच अद्याप न झालेला पाऊस यामुळे पिके जगवणे अवघड बनले आहे. अशा स्थितीत ठिबक सिंचनामुळे 50 ते 60 टक्के पाण्याची बचत होणार आहे. त्याबरोबरच उसाच्या उत्पन्नात 30 टक्के वाढ होऊ शकते, असे काळे यांनी म्हटले.
गेल्या चार लागवड हंगामात 657 शेतकर्‍यांच्या 1358 एकर क्षेत्रास ठिबक सिंचनाचा लाभ झाला आहे. यासाठी 35 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. प्रति एकर खर्चापैकी 3500 अथवा 10 टक्के रक्कम शेतकर्‍याने भरावयाची आहे. उर्वरित रक्कम कारखाना कर्जरूपाने उभारणार आहे.’’
-कल्याणराव काळे, अध्यक्ष, सहकार शिरोमणी साखर कारखाना