आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxminarayan Bolli Writing Novel On Ram Ganesh Gadkari

लक्ष्मीनारायण बोल्ली लिहिणार राम गणेश गडकरींवर कादंबरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सत्तरीच्या पायरीवर, पाय माझा ठेवतो
पाहिलेले, साहिलेले वळुनि मागे पाहतो
अशी शब्दसुमने वाहत ज्येष्ठ कविवर्य डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी राम गणेश गडकरी यांच्यावर कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 15) ते 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ‘कविराय राम जोशी’, ‘कृष्णदेवराय’ या कादंबरीनंतर ही त्यांची तिसरी कादंबरी आहे. सत्तरीत पदार्पण करताना ते म्हणतात-

फुलत फुलत राहीन मी, माती माझी सुकेपर्यंत
लिहीत लिहीत राहीन मी, श्वास माझा थांबेपर्यंत
त्यांच्या तिसर्‍या कादंबरीचे नाव आहे, ‘विर्शब्ध शारदेची स्वाक्षरी : राम गणेश गडकरी.’ त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘ज्या कवीने मला मराठी कवितेकडे वळवले; त्यांच्याबद्दल लिहिण्याचे ठरवलेलेच होते. गडकरी यांच्याबद्दल आतापर्यंत 209 जणांनी लेखन केले आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेच्या छटा उलगडणारी 142 पुस्तके लिहिली गेली. त्यांच्या आठवणी, चुटके आदींचा विषय त्यात आहे; परंतु कादंबरी नाही. अवघे 34 वर्षे आयुष्य लाभलेल्या गडकरींनी ‘गोविंदाग्रज’ नावाने कविता लिहिल्या. त्या अतिशय उत्कट होत्या. त्यांना दोन प्रेयसी. पैकी एकीने संस्थानिकाशी लग्न केले. त्या वेळी त्यांनी लिहिले-

‘‘केल्या ज्याच्या पायघड्या मी, जिच्या पावलासाठी
त्या हृदयाला तुडवून गेलीस, नटव्या थाटासाठी.’’

अफाट विनोदी बुद्धी असणार्‍या गडकरींचे आचार्य प्र. के. अत्रे शिष्य होते. त्यांनी ‘अप्रकाशित गडकरी’ हे पुस्तक लिहिले. 26 मे 1885 रोजी गडकरींचा जन्म झाला. त्यांचे बालपण गुजरातमध्येच गेले. पुण्यातल्या कर्जत प्रशालेतून पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर विनायक या थोरल्या भावाच्या मदतीने पुढील शिक्षण घेत, फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली. थोडासा विक्षिप्त स्वभाव असल्याने पहिली बायको लग्नानंतर महिनाभरातच निघून गेली. 32 व्या वर्षी रमाबाईंशी दुसरा विवाह झाला. त्यानंतर 23 जानेवारी 1919 रोजी गडकरींनी जगाचा निरोप घेतला. 23 जानेवारी 2014 रोजी त्यांचा 95 वा स्मृतिदिन आहे. त्याच दिवशी या कादंबरीचे प्रकाशन व्हावे, अशी इच्छा असल्याचेही डॉ. बोल्ली म्हणाले.
राजर्षी शाहू छत्रपती ग्रंथाचा तेलुगु अनुवाद करणार
‘राजर्षी शाहू छत्रपती’ या चरित्रग्रंथाचा तेलुगुत अनुवाद करण्याचे काम सुरू केल्याची माहिती डॉ. बोल्ली यांनी दिली. शाहू महाराजांचे कार्य इतर अनेक भाषांमध्ये येत आहे. तेलुगु भाषेतूनही या महान राजाचा परिचय व्हावा, या उद्देशाने हे काम सुरू केल्याचे ते म्हणाले. प्रख्यात तेलुगु पंडित गडियारम रामकृष्ण शर्मा यांच्या ‘कमलपत्र’ला साहित्य अकादमीने गौरवले. ते मराठीतून आणण्याची जबाबदारी साहित्य अकादमीने सोपवली होती. ते नुकतेच पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.