आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत ‘एलबीटी’ भरण्यासाठी लवकरच येणार अभय योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - थकीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) वरील व्याज दंड माफ करण्यासाठी नगरविकास खात्याकडून लवकरच ‘अभय योजना’ (अ‍ॅम्नेस्टी स्कीम) देणार असल्याची माहिती नगरविकास खात्याच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

व्यापार्‍यांच्या प्रचंड विरोधामुळे राज्य शासनाने एलबीटी रद्दची घोषणा केली. ऑगस्ट २०१५ नंतर नवी करप्रणाली येईल. या कालावधीत व्यापार्‍यांनी एलबीटी भरावी, असे नगरविकास खात्याने म्हटले आहे. व्यापारीही त्याला अनुकूल आहेत. परंतु त्यावर दंड आणि व्याज माफ करण्याची मागणी केली. त्यावर ऑगस्ट अखेरपर्यंत मूळ रक्कम भरणार्‍यांना ‘अभय योजना’ देण्याचा विचार असल्याचे म्हैसकर म्हणाल्या.

एलबीटी संदर्भात पाठवलेल्या दंडाच्या नाेटिसा रद्द कराव्यात, एलबीटीसाठी नाेंदणी झालेल्या व्यावसायिकांचा या याेजनेत समावेश करावा, एलबीटीसाठीचे लेखापरीक्षण सादर करण्यास कालमर्यादा निश्चित करावी आणि महापालिका हद्दीत येणार्‍या कुठलीही प्रक्रिया करता हद्दीबाहेर जाणार्‍या जाॅबवर्कसाठी ९० टक्क्यांएेवजी १० टक्के भरणा असावा, अशा मागण्या व्यापारी प्रतिनिधींनी केल्या. त्यामुळे पालिकेचे उत्पन्नही बुडणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ‘फाम’चे अध्यक्ष माेहन गुरुनानी, सोलापूर व्यापारी संघटनेचे सचिव राजू राठी, दीपेन अग्रवाल, टी. निकुंज, अजित मेहता, मितेश प्रजापती, जिम्मी पाॅल आदी उपस्थित हाेते.

व्यापार्‍यांना उपयोगी ठरेल
एलबीटीरद्द हाेणार म्हणून काही व्यापार्‍यांनी भरणा केला नसेल अशांसाठी ही योजना उपयाेगी ठरेल. व्यापार्‍यांनी एलबीटीची मुद्दल भरल्यास व्याज दंड माफ हाेणार आहे. मात्र, याबाबत शासनाचा आदेश अद्याप निघायचा आहे.” मोहनगुरनानी, ‘फाम’चे अध्यक्ष

ताण कमी होईल
दंड आणि व्याज माफ झाल्याने व्यापारी विशिष्ट मुदतीत रक्कम भरतील. त्यामुळे महापालिकेची झालेली आर्थिक कोंडी सुटण्यास मदत होईल. शासनाने तातडीने हा निर्णय घेऊन व्यापार्‍यांना आणि पर्यायाने महापालिकेला दिलासा द्यावा.” राजूराठी, सचिव सोलापूर व्यापारी महासंघ