आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍यांनो, एलबीटी भरा अन्यथा फौजदारी; सोलापूरच्या आयुक्तांकडून कारवाईचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) वसुलीसाठी सक्तीने पाऊल उचलण्याचे संकेत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले. येत्या पंधरा दिवसांत वसुली सुरू होईल. कर न भरणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज भासल्यास तेही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नुकतीच याबाबत व्यापार्‍यांची बैठक घेतली होती. तीत सोलापूर व्यापारी महासंघ आणि सोलापूर चेंबर्स ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रिज अँड अँग्रिकल्चर यांनी अनुकूलता दाखवत कर भरण्याचे आश्वासन र्शी. गुडेवार यांना दिले होते. तसेच दोन्ही संघटनांनी व्यापार्‍यांना कर भरण्याचेही आवाहन केले होते. मात्र, तरीही व्यापार्‍यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने र्शी. गुडेवार यांनी नाराजी व्यक्त केली. एका खासगी कार्यक्रमात झालेल्या भेटीदरम्यान संवाद साधल्यानंतर गुडेवार यांनी ही माहिती दिली.

एलबीटी विभाग प्रमुख सुनील माने यांच्याकडील जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली आहे. नियोजन करून वसुली सुरू करण्यात आली आहे. मोठय़ा थकीत रकमा असलेल्या व्यापार्‍यांची यादी तयार करण्याचे आदेश दिल्याचीही माहिती गुडेवार यांनी दिली.

कायदा असे पर्यंत एलबीटी भरा : आयुक्त
आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेची बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, व्यापार्‍यांनी एलबीटीच्या रूपात नागरिकांकडून रक्कम वसूल केलेली आहेच. ती रक्कम त्यांनी महापालिकेत भरायची आहे. त्याविषयी वारंवार आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, व्यापार्‍यांकडून प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेच्या तिजोरीचे मुख्य स्रोत असलेली जकात 1 एप्रिल 2011 पासून बंद झाली. त्याऐवजी एलबीटी लागू झाला. व्यापार्‍यांचा त्यास विरोध आहे. त्यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. पण, जोपर्यंत कायदा आहे, तो पर्यंत व्यापार्‍यांनी एलबीटी भरावा. ही रक्कम त्यांना ग्राहकांकडून घेतलेली आहे, अशी भूमिका पालिकेची आहे.

पद्धतशीरपणे दिशाभूल
शहरात माल पद्धतशीरपणे दिशाभूल करून आणला जात आहे. पावती वेगळी दाखवून शहराबाहेर नेत असल्याचे दाखवण्यात येत आहे. किरकोळ स्वरूपाचा माल शहरात आणल्याचे दाखवले जाते. यामुळे महापालिकेचे दरवर्षी 5 ते 10 कोटींची नुकसान होत आहे. व्यापारी मनपाची दिशाभूल करत आहेत का? याची तपासणी करण्यात येत आहे.

एका उद्योजकामार्फत निरोप
शहरातील एका नामांकित उद्योजकामार्फत (नाव सांगण्यास नकार) काही ठरावीक मोठय़ा व्यापार्‍यांना निरोप आयुक्तांनी पाठवला. त्यामुळे व्यापारी एलबीटी भरतील, अशी आशा आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केली.

मोठय़ा व्यापार्‍यांवर कारवाई
एलबीटी भरून व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, अन्यथा पुढील पंधरवड्यात फौजदारी कारवाई करण्याचे अस्त्र मनपास वापरावे लागणार आहे. एलबीटीमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही.
- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका