आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा एलबीटीचा: सोलापूरचे आयुक्त घेणार 143 व्यापार्‍यांची सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. टॉपच्या 143 व्यापार्‍यांना नोटीस देण्यात येणार आहे. 26 सप्टेंबरपासून स्वत: आयुक्त गुडेवार हे रोज 15 व्यापार्‍यांची सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर एलबीटी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जकातऐवजी एलबीटी कर लागू केले असताना त्यास व्यापार्‍यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापलिकेची आर्थिक स्थिती कोलमडत चालली आहे. वारंवार प्रयत्न करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने महापालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी आयुक्तांनी व्यापारी संघटनेची बैठक घेतली. एलबीटी भरण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने आता कारवाई करण्यासाठी आयुक्त पुढे सरसावल्याचे दिसत आहे. कारवाईचा एक भाग म्हणून शहरातील 143 मोठय़ा व्यापार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे.

>26 सप्टेंबरनंतर रोजी 15 जणांची होईल सुनावणी

यांची होणार तपासणी
खरेदी-विक्री नोंद वही, चलन, कॅश बुक याशिवाय व्यापार्‍यांकडील उपलब्ध कागदपत्रे
यांच्यावर आहे लक्ष
दारू, स्टील, सूत, सळई, सिमेंट, सौंदर्य प्रसादने

कायद्यानुसार कारवाई
एलबीटी थकीत राहिल्याने मोठय़ा व्यापार्‍यांना म्हणणे मांडण्याची शेवटची संधी देणार आहोत. त्यानंतर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई होईल.
-चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त

नोटीस आल्यावर पाहू
आम्हाला सुनावणीसाठी तारीख मिळाली नाही. व्यापार्‍यांना नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. आम्ही एलबीटी ऐवजी शहर विकास कर भरत आहोत. तशा सूचना व्यापार्‍यांना दिल्या आहेत.
-प्रभाकर वनकुद्रे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

पुढे काय?
सुनावणीत समाधानकारक उत्तर मिळल्यास व्यापार्‍यांना एलबीटी भरण्यास मुदत देण्यात येईल.
समाधान न झाल्यास फौजदारी कारवाई.
थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दंड.