आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलबीटी’ भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत, त्यानंतर कडक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्थानिकसंस्था कर (एलबीटी) भरण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन कारवाई सुरू करेल, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पत्रकारांना दिली.
‘एलबीटी’पोटी व्यापाऱ्यांकडे ४९ कोटी रुपये थकीत आहेत. ती रक्कम २० एप्रिलपासून भरण्याची तयारी चेंबर आॅफ काॅमर्सने दाखवली होती. परंतु व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

२०११ पासून शहरात ‘एलबीटी’ लागू झाली. त्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ‘एलबीटी’ रद्द करू अशी घोषणा केल्यानंतर वसुली मंदावली. आॅगस्टपासून ‘एलबीटी’ रद्द होणार आहे. त्यापूर्वीची थकबाकी वसूल करावी, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

आयुक्त म्हणाले, व्यापाऱ्यांकडून ‘एलबीटी’ वसुली समाधानकारक होत नाही. त्यांनी दोन दिवसांत भरावे अन्यथा महापालिका कारवाई करणार आहे. ती कारवाई कडक असेल, असेही स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच सोलापूरला आले होते. त्यावेळी आयुक्त काळम-पाटील यांनी भेट घेऊन महापालिकेच्या आर्थिक स्थिती विकासकामांविषयी माहिती दिली होती. त्यात व्यापाऱ्यांकडे एलबीटीपोटी ४७ कोटी ८३ लाख ८६ हजार रुपये थकबाकी आहे. शहरात हजार ७७९ नोंदणीकृत व्यापारी आहेत. सन २०१३-१४ मध्ये हजार ८०२ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र भरले तर हजार १५३ व्यापाऱ्यांनी भरले नाही. १०७ व्यापाऱ्यांना नोंदणी केली नाही. यासाठी नोटीस दिली असल्याचेही सांगितले होते.

‘एलबीटी’ महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. ते वसूल होत नसल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. पालिकेकडे रक्कम नसल्याने गेल्या काही महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर झालेले नाहीत. मक्तेदारांची बिले अदा झालेली नसल्याने विकास कामे खोळंबली आहेत.

व्याज, दंडासह वसुली

सराफ व्यापाऱ्यांकडे ४० कोटी रुपये एलबीटी थकबाकी असल्याचे एलबीटी विभागाकडून सांगण्यात अाले. व्याज दंडासह ती रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. असेस्टमेंट केल्याशिवाय ही रक्कम कळणार नाही. सराफ व्यापाऱ्यांनी एलबीटी भरावे, असे आवाहन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी केले.