आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लेव्ही साखर’प्रकरणी कारवाईत प्रशासनाकडून होतेय चालढकल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्र शासनाच्या लेव्ही साखर वितरण आदेशानुसार राज्यातील 38 सहकारी साखर कारखान्यांनी शासनास साखर पुरवठा न केल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 कारखान्यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी तीन खासगी कारखान्यांवर गेल्या पंधरवड्यात फौजदारी कारवाई केली. पण अन्य सहकारी कारखान्यांवर कारवाईसाठी मात्र प्रशासनाने हात आखडता घेतला आहे.

लेव्ही साखर न दिल्याने केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय व अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्थापनाचे संचालक कल्याण नाग (दिल्ली) यांनी राज्यातील साखर कारखान्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश देऊन बराच काळ लोटला. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश त्या-त्या संबंधित तहसीलदारांना दिले. त्यानुसार लोकमंगल शुगर इथेनॉल अँण्ड को जनरेशन, भंडारकवठे, विठ्ठल शुगर कॉर्पोरेशन, म्हैसगाव आणि लोकमंगल अँग्रो इंडस्ट्रीज, बीबीदारळ या तीन कारखान्यांवर चार गुन्हे दाखल झालेत. उर्वरित कारखान्यांवर मात्र कारवाईचा बडगा उचललेला नाही.

आदेशाने कारवाई
जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये लेव्हीची साखर न देणार्‍या कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे. लोकमंगल, विठ्ठल शुगर यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. इतर कारखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. लवकरच याप्रकरणी गुन्हे दाखल होतील.’’ प्रमोद गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

तहसीलदारांकडून कारणांचा पाढा
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, स्वामी सर्मथ साखर कारखाना, संतनाथ (भोगावती) साखर कारखाना, सांगोला साखर कारखाना यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. सांगोला कारखान्याने परभणीच्या पुरवठा अधिकार्‍यांना साखर देण्यास सहमती दाखविल्याचे कळविले आहे.

‘दामाजी’ने जपली परंपरा
25 ऑगस्ट 2012 च्या आदेशान्वये मध्यप्रदेश राज्यशासनाला लेव्हीची 26880 क्विंटल साखर न दिल्याप्रकरणी मंगळवेढय़ाच्या दामाजी साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्या कारखान्याने तातडीने साखर पुरवठा करून दामाजींची परंपरा जपली.

संचालकांची नावे मिळेनात
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडील साखर जप्त करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश 29 मे रोजी तहसीलदारांना दिला होता. संचालक मंडळांची नावे नसल्याने कारवाई झालेली नाही. अक्कलकोटच्या स्वामी सर्मथ कारखान्यावर कारवाईचे 18 जून रोजी आदेश दिले.