आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लाइफ लाइन’ची लाइफ संपुष्टात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीत रासायनिक उत्पादने करणार्‍या लाइफ लाइन इंडस्ट्रीजने दिवाळखोरी जाहीर केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने कर्जवसुलीचा दावा केल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून लिक्विडेटर (अवसायक)ची नियुक्ती झाली आहे. धीरेंद्र सावंत यांनी अवसायक म्हणून पदभार घेऊन कंपनीला टाळे ठोकले. कामगारांच्या देयरकमा मात्र अडकल्या आहेत.

एलबीटीचे कारण
कंपनीने गेल्या वर्षी मुंबईतील आर्च फार्मालॅब्स लिमिटेडशी करार करून मजुरी तत्त्वावर उत्पादने पुरवण्याचे काम सुरू केले होते. आर्च कंपनीकडून कच्चा माल सोलापूरला यायचा. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा पाठवले जायचे. मुंबईतून येणार्‍या कच्च्या मालाची वाहने सोलापूरच्या हद्दीत आल्यानंतर अडवली गेली. स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरल्याशिवाय वाहने सोडणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर लाइफ लाइनच्या व्यवस्थापनाने महापालिकेच्या आयुक्तांना भेटून कंपनी कुठलेही अंतिम उत्पादन बनवत नाही, त्याची विक्री करत नाही. केवळ मजुरीवर उत्पादन प्रक्रिया करत असल्याचे स्पष्ट केले. परंतु महापालिकेने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यामुळे आर्च कंपनीने कच्चा माल पुरवणे बंद केले. परिणामी लाइफ लाइनमधील उत्पादन बंद झाल्याचे युनिट प्रमुख व्ही. एस. पाटील म्हणाले. कंपनीत 38 कामगार कार्यरत आहेत. शिवाय अप्रत्यक्ष कामात सुमारे दोनशे जणांची उपजीविका होती.

संचालक आहेत कुठे?
कंपनी संचालक निकुंज कीर्ती कनाकिया (मुंबई) यांना सोलापुरातील कंपनी बंदच करायची होती. त्याच उद्देशाने त्यांनी कंपनीचे व्यवहार मुंबईला जोडले होते. आर्च फार्मालॅब्सला कंपनी देण्याचा करारही केला. इंडियन ओव्हरसीज बँकेकडे कंपनीची मालमत्ता तारण असताना हा करार करून कामकाज गुंडाळण्यास सुरवात केली होती. परंतु बँकेने वेळीच हस्तक्षेप केल्याने उच्च् न्यायालयाकडून अवसायकाची नियुक्ती झाली. परंतु या घडामोडींची कुठलीच कल्पना कामगारांना नव्हती, हे विशेष. गेल्या तीन वर्षांपासून कनाकिया सोलापूरला आले नाहीत. ते परदेशात असल्याचे कंपनीचे मुंबईतील व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

आर्थिक व्यवहार गुंडाळले
गेल्या 15 वर्षांपासून कंपनीचा रोखपाल म्हणून काम करतो. कंपनीचे आर्थिक व्यवहार सोलापुरातून होते. परंतु गेल्या काही दिवसांत हे व्यवहार मुंबईच्या मुख्य व्यवस्थापनाशी जोडण्यात आले. कामगारांचे वेतन, त्यातील वजावटही तिथूनच होऊ लागली होते. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीची नेमकी कल्पना आली नाही.’’ रमाकांत माने, कंपनी रोखपाल

कंपनी बंदच करायची होती
गेल्या काही दिवसांतील कंपनी कारभाराकडे पाहिल्यास संचालकांना उत्पादन बंद पाडायचेच होते. व्यवस्थापनही त्या कारणाच्या शोधात होते. त्यांना ‘एलबीटी’चे कारण मिळाले आणि उत्पादन बंद केले. पण आम्हा कर्मचार्‍यांची फसवणूक झाली. आमच्या देयरकमांबाबत कोणीच बोलत नाहीत.’’ तानाजी देवकर, स्टोअर असिस्टंट

घातक रसायने हाताळली
कच्चा माल अतिशय घातक होता. सायनो अँसिटिक अँसिड, अल्कल नायट्रेट हे कामगार हाताळायचे. सोडियम सायनाइडसारखे पदार्थही उघड्या हातांनी ने-आण करायचो. सुरक्षेची साधनेच कंपनीने दिली नाहीत. कामगारांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्याची भरपाई तरी मिळावी.’’ मनोहर वंजारी, कामगार