आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टच्या परवान्याचा विषय गुलदस्त्यात; मृत्यू शॉकमुळेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लिफ्टमध्ये विजेचा धक्का बसून मुलीचा मृत्यू झाल्यानंतर लिफ्टचा विषय वादात सापडला आहे. एकीकडे महापालिकेतील बांधकाम विभागाची फाइल सापडत नाही, तर दुसरीकडे लिफ्टसाठी परवानगी देणार्‍या बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणार्‍या इलेक्ट्रिक विभागाकडेही त्याच्या नोंदीबाबतचा संभ्रम कायम आहे. कोणत्याही परवानग्या न घेताच लिफ्ट बसवल्याचे समोर येऊ लागले आहे.

कोणत्याही अपार्टमेंटमध्ये लिफ्ट बसवण्यापूर्वी त्याची परवानगी चेंबूर, मुंबई येथे असलेल्या उद्वाहन निरीक्षण कार्यालयाकडून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठीच्या नियमांचेही पालन आवश्यक आहे. बांधकाम परवान्याला ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हा नियम धाब्यावर बसवूनच त्याची कार्यवाही झाल्याचे समोर येऊ लागले आहे. कारण परवानगी घेतली की नाही याचा शोध इलेक्ट्रिक विभागाकडून आता सुरू झाला आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. महापालिकेतही ती फाइल सापडत नाही.

देखभालीकडे झाले दुर्लक्ष
अपार्टमेंटमध्ये बसवलेली लिफ्ट सहा ते सात वर्षांपूर्वीची आहे. ती गुजरातमधील टेक्नोएलिव्हेटर कंपनीची आहे. लिफ्टची परवानगी एका वर्षासाठी असते, ती कंपनीच घेऊन देते. त्यानंतर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्याचे दरवर्षी नूतनीकरण करून घेतले पाहिजे व त्याची देखभालही केली पाहिजे. कंपनी एक वर्षाचीच गॅरंटी देत असते. ही कार्यवाही या ठिकाणी झालेली दिसत नाही.

पुढील चौकशी सुरू
15 मीटरहून अधिक उंच असणार्‍या इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा आवश्यक असते. परंतु लिफ्टची दुर्घटना झालेल्या इमारतीत ती यंत्रणा बसवण्यात आली नाही. तेथे घटना घडल्याने पुढील चौकशी करण्यात येत आहे. मनपा बांधकाम परवाना विभागाकडून माहिती घेऊन त्या इमारतीस बांधकाम व वापर परवाना आहे का? याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. केदार आवटे, मनपा अग्निशमन दलाचे प्रमुख

विजेच्या धक्क्यानेच मृत्यू
लिफ्टमध्ये मृत्यू पावलेल्या राजलक्ष्मी शिंदे हिचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला आहे. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले . त्यातून ही बाब निष्पन्न झाली आहे. डी. डी. गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल हॉस्पिटल

पोलिस तपास आजपासून
लिफ्ट दुर्घटना प्रकरणाच्या मुख्य तपास कामाला बुधवारी सुरुवात होईल, अशी माहिती पोलिस विभागाचे तपास अधिकारी पटेल यांनी दिली. मंगळवारी तिसरा दिवस असल्याने उद्या बोलू, असे शिंदे कुटुंबीयांनी सांगितल्याचे ते म्हणाले. इमारतीला लिफ्टचा परवाना आहे का?, तो मुदतीतील आहे का? हे तपासण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.