आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चळवळीच्या मारेक-यांचा एकीने बुरखा फाडा, माजी मंत्री प्रा. ढोबळे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सर्वच क्षेत्रात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे मारेकरी येऊन थांबले आहेत. बहुजनांच्या एकीनेच त्यांना रोखता येईल, असे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. आंबेडकरांनी दिलेली कवचकुंडले घेऊन मारेकऱ्यांचा बुरखा फाडता आले पाहिजे. तरच ही मंडळी पळून जातील, असेही ते म्हणाले.

अजिंक्य कल्चरल अकॅडमीच्या वतीने आयोजित १३ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. शहाजी गडहिरे यांनीही त्यात सहभाग घेतला. विठ्ठल पाथरुट अध्यक्षस्थानी होते. ‘सावधान, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे मारेकरी येत आहेत’ हा परिसंवादाचा विषय होता.
संमेलनाच्या दुपारच्या सत्रात झालेल्या परिसंवादात मार्गदर्शन करताना श्री. गडहिरे यांनी राज्यात झालेल्या दलित हत्याकांडाची उदाहरणे देऊन गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. परंतु श्री. ढोबळे यांनी मारेकऱ्यांना पळवून लावण्यासाठी शिक्षणातून ‘आयएएस’ बाहेर पडले पाहिजेत. तेच मारेकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे करू शकतील, असे म्हणाले. स्त्रीमुक्ती, जातविरहित समाजव्यवस्थेची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. समतेचा नारा दिला. संविधानातून हक्क आणि अधिकार िदले. बापाने एवढी मोठी इस्टेट करून ठेवली तरी लेकरांना ती घेता येत नाही, अशी स्थिती आज िनर्माण झाल्याची खंत रविवारी झालेल्या परिसंवादात उमटली. आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रविवारी पहिल्या सत्रात परिसंवाद झाला. यावेळी वक्त्यांनी विविध विषयावर आपले विचार मांडले. रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष राजा इंगळे अध्यक्षस्थानी होते.
‘त्यांना’ घटना अडचणीची वाटते
शहाजीगडहिरे(सामाजिक कार्यकर्ते)-हिंदुत्व हेचश्रेष्ठत्व मानणाऱ्यांना आता घटना अडचणीची वाटू लागली आहे. ‘भगवद््गीता’ राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करण्याची मागणी म्हणजे देशाच्या अखंडतेला आव्हान आहे. त्यांना संविधान सर्वश्रेष्ठ वाटत नाही. त्यातील ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्दच काढून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
कर्डकांनी चळवळ घरोघरी पोचवली
डॉ.धम्मपाल माशाळकर - आंबेडकरीविचार घराघरापर्यंत पोचवण्याचे काम शाहिरांनी केले. सर्वात मोठे योगदान वामनदादा कर्डक यांनी दिले. त्यासाठी त्यांनी धनाची कधीच अपेक्षा केली नाही. पैसे नसल्याने बायको सोडून गेली. अडीच वर्षांची मुलगी साखर मागत होती. शेवटी साखर साखर म्हणत मेली. तिला साखर देण्याची ऐपतही कर्डकांकडे नव्हती. परंतु त्यांनी चळवळ सोडली नाही. प्रत्येक गीतेतून त्यांनी समाजाला जाब विचारण्याचे काम केले.
जात निर्मूलनाचा दिला संदेश
प्रा.सुनील गायकवाड - जातीव्यवस्थेतनैतिकता असूच शकत नाही. त्यामुळे जात निर्मूलन झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका बाबासाहेबांनी सातत्याने मांडली. त्यासाठी त्यांना लोकसहभाग अपेक्षित होता. जनसमुदायांना घेऊन त्यांनी अनेक सत्याग्रह केले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह असो, की काळाराम मंदिर प्रवेशाचा. जाती नष्ट करण्यासाठीच त्यांनी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल होते. जातविरहित समाजव्यवस्थेसाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाची संकल्पनाही मांडली.
स्त्रियांची प्रगती मोजली
प्रा.संदेश वाघ - कुठल्याहीसमाजाची प्रगती ही त्या समूहातील स्त्रियांच्या प्रगतीवर मोजता येते, असे बाबासाहेब म्हणत. स्त्रिया शिकल्या पाहिजेत, त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, यावर ते आग्रही असत. त्यासाठी लिंगभेदावर आधारलेल्या व्यवस्थेत त्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली. संविधान लिहून त्यांनी स्त्रियांना दास्यातून मुक्तही केले. देशातील स्त्रीवादी चळवळीचा विकास हा संविधानामुळेच झाला. यावर कुणाचेच दुमत असणार नाही.
स्त्रिया लिहू लागल्या
प्रा.ज्योती सुरवसे - आंबेडकरीचळवळीत सहभागी महिलांनी वेदना, विद्रोह, नकार आदी विषयांवर विपुल लेखन केले. कविता केल्या. त्यांच्या लेखनात शोषित, पीडितांच्या वेदना आहेत.हिरा बनसोडे या पहिल्या कवयित्री म्हणून पुढे आल्या. वंचितांसाठी त्यांनी ‘प्रकाशाचे दिवे’ आणले होते. त्यांच्या नंतर सुगंधा शेंडे, प्रज्ञा लोखंडे, मल्लिका अमर शेख, सुरेखा भगत अशा अनेक कवयित्री आल्या. फुले, शाहू, आंबेडकरी विचार मांडू लागल्या. बाबासाहेबांना अभिप्रेत अशी स्त्रीमुक्ती चळवळ त्यांनी सुरू केली.
मी रमाबाई बोलते अन् जखमी भारत
यासंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘मी रमाबाई बाेलतेय’ हे एकपात्री नाटक श्रद्धा सनमाडीकर यांनी उत्कृष्ट सादर केले. त्यांच्या अभिनयाने सभागृह स्तब्ध झाला होता. परंतु वेळेअभावी त्यांचे नाटक मध्यातच थांबवण्यात आले. त्यानंतर आशुतोष नाटकर यांनी ‘जखमी भारत’ हे एकपात्री नाटक सादर केले. तेही अतिशय सुंदर झाले.