आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगगाडा मिरवणुकीविना यंदा रंगपंचमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याशिवाय रंगपंचमी खेळण्यासाठी अनेक संस्था व समाज पुढे सरसावताना दिसत आहेत. गुरुवारी मीठ गल्ली परिसरातील मन्मथेश्वर देवस्थान व लष्कर येथील लोधी समाजाने बैठका घेऊन रंगगाड्यांची पारंपरिक मिरवणूक न काढता यंदाची रंगपंचमी ‘दिव्य मराठी’च्या टिळा होळी संकल्पनेनुसार साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास दोन लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.
‘दैनिक दिव्य मराठी’ मागील 15 दिवसांपासून पाणी बचत करा, कोरडे रंग लावून रंगपंचमी साजरी करा, असे आवाहन करत आहे. त्या आवाहनास प्रतिसाद देताना राजपूत समाजाने 250 वर्षांची परंपरा असलेल्या रंग गाड्यांच्या मिरवणुकीला फाटा देत यंदाच्या वर्षी रंगगाड्यांना विर्शांती दिली. केवळ सुक्या रंगांचा टिळा लावला. तसेच गुरुवारी रंगभवन परिसरातील र्शी शीतलादेवी मंदिरमध्ये लोधी समाजाच्या पंच मंडळींनी बैठक घेतली. बैठकीत पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी माणिकसिंग मैनावाले, हनुमानसिंग चौधरी, हिरासिंग मोतीवालेबिबिसिंग कय्यावाले, सुरेश शिवसिंगवाले, राजू जमादार, भारतसिंग बडुरवाले, संजय मैनावाले, मोहनसिंग हजारीवाले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

ब्रिजधाम प्रतिष्ठानचेही आवाहन : सोरेगाव येथील ब्रिजधाम प्रतिष्ठाननेही कोरडी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

अशी होईल पाणी बचत
लोधी समाजाच्या रंग गाड्या मिरवणुकीत 40 ते 50 बैलगाड्यांत 130 पाण्याचे पिंप असतात. 200 लिटरप्रमाणे 120 पिंपाचे 26 हजार लिटर पाणी वाचेल व ते पुन्हा भरण्यासाठी सात हजार लिटरचे चार टँकर येतात. याचे एकूण 24 हजार लिटर असे एकूण 50 हजार लिटर पाणी रंगामुळे वाया जाते. तर मार्गावर नागरिकही घरासमोर पिंप ठेवून आणि गच्चीतून पाणी टाकतात. पाणी टाकू नये असे परिसरात आवाहन करण्यात आल्यामुळे तेथेही किमान 20 हजार लिटर पाण्याची बचत होणार आहे. शिवाय हे रंग काढण्यासाठी अंघोळीत जे पाणी वापरले जाते त्याचीही बचत होईल. असे जवळपास 80 हजार लिटर पाणी वाचवण्याचा प्रयत्न होणार आहे.

‘मन्मथस्वामी’च्या मूर्तीस टिळा लावून रंगोत्सव
मीठ गल्ली परिसरातील र्शी मन्मथेश्वर देवस्थान आणि कुंभार वेस परिसरातील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने मागील 72 वर्षांपासून रंग गाड्यांची मिरवणूक काढण्यात येते. यंदाच्या वर्षी मिरवणूकच न काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. देवस्थानातील र्शींच्या मूर्तीस केवळ टिळा लावून सण साजरा करण्याचे ठरवण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष तम्मा गंभीरे, महादेव चाकोते, बंडप्पाण्णा शरणार्थी, सिद्धेश्वर जिगजिणी, आनंद मुस्तारे, हणमंतु महाजन, अँड. रेवणसिद्ध कोनापुरे, मन्मथ वारद, सुभाष मेंगाणे आदी उपस्थित होते.

राजस्थानी विकास मंडळही ‘टिळा होळी’साठी सरसावले
यंदाची रंगपंचमी फक्त टिळा लावून साजरी करण्याचा निर्णय राजस्थानी विकास मंडळासह इतर चार मंडळांनी घेतला. समस्त मारवाडी समाज बांधवांनी पाण्याचा अपव्यव टाळून टिळा होळी साजरी करावी, असे आवाहन राजस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष विजय जाजू यांनी केले. राजस्थानी विकास मंडळ, माहेश्वरी प्रगति मंडळ, माहेश्वरी महासभा, मारवाडी युवा मंचच्या वतीने यंदा रंगपंचमीनिमित्त ‘रंगारंग’ कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम 30 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता महेश गार्डन येथे आहे. यावेळी दुष्काळग्रस्त भागात दोन हजार लिटर पाण्याच्या सिंटेक्स टाक्या आणि जनावरांना प्लास्टिकच्या मोठय़ा कुंड्या देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून गरजेच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात येतील.

गाड्याच काढणार नाही
जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहता हा निर्णय घेण्यात आला. यामुळे जवळपास 25 हजार लिटर पाण्याची बचत होईल. इतके जरी केले तरी याकामी थोडाफार खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळेल.’’ तम्मा गंभीरे, अध्यक्ष, मन्मथेश्वर देवस्थान

250 वर्षांत पहिल्यांदा
महाराष्ट्रात केवळ सोलापुरात लोधी समाजातर्फे रंगपंचमी दिवशी रंग गाड्यांची मिरवणूक काढण्यात येते. 100 फुटांपर्यंत जाणार्‍या पिचकारीचा हा उत्सव पाहण्यासाठी परराज्यांतूनही नागरिक सोलापुरात येतात. यंदाच्या वर्षी हा प्रकार नसेल. 250 वर्षांत पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला आहे.’’ माणिकसिंग मैनावाले, लोधी समाजातील मान्यवर

गल्लीतही नसेल रंग
केवळ मिरवणुकीतच नाही तर ज्या मार्गावरून ही रंग गाड्यांची मिरवणूक निघते तेथेही गल्लीबोळातून मिरवणुकीवर पाणी ओतले जाते. यंदाच्या वर्षी परिसरात पाणी बचतीचे फलक लावून पाणी टाकू नका असे आवाहन करण्यात येणार आहे. ‘दिव्य मराठी’चा पाणी बचतीचा आणि टिळा होळीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. त्याचे पालन व्हावे.’’ हनुमानसिंग चौधरी