आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहारातील दंगलप्रकरणातील चौघांना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळल्याच्या कारणावरून शहरातील दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणातील आणखी चार जनांना लोहारा पोलिसांनी अटक केली असून यामध्ये लोहार्‍याचे विद्यमान उपसरपंच अभिमान खराडे यांचा समावेश आहे.

सोमवारी (दि. 18) सकाळी 10:10 वाजता या चौघांना अटक केली. त्यांना लोहारा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

लोहारा येथे दि. 22 फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक आझाद चौकात आली असता गुलाल उधळीत असताना ध्वज कट्टय़ांवर गुलाल पडल्याच्या कारणांवरून दोन गटांत हाणामारी झाली होती. या हाणामारीत दोन पोलिस कर्मच्यार्‍यांसह, एक गृहरक्षक दलाचा जवानही गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी दंगलीमध्ये सहभागी झालेल्यांविरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल काशिनाथ राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी चार अल्पवयीन बालकांसह 18 जनांना अटक करून कारवाई करण्यात आली आहे. यातील फरार असलेल्या उपसरपंच अभिमान खराडे, उमाकांत भरारे, काका घोडके, रियाज भोंगळे या चार जणांना अटक केली आहे. त्यांना लोहारा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुमित जोशी यांनी चारही जनांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखली पोलिस निरीक्षक रामचंद्र कुंभार करीत आहेत. दरम्यान, या दंगलीस कारणीभूत ठरलेले ध्वजकट्टे ग्रामसभेत ठराव घेऊन हटवण्यात आले आहेत. शहरातील सुमारे दहा ध्वजकट्टे हटवल्यामुळे चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.