आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

सोलापूर भाजपची मोदी लाटेवरच प्रचार भिस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट देशात आहे. मोदी प्रभावाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सोलापूर भाजपमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली असताना भाजप अद्याप काही निवडक पदाधिकार्‍यांच्या बैठकी घेण्यावरच भर देत असल्याचे दिसत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून अँड. शरद बनसोडे यांच्या नावाची घोषणा 13 मार्च रोजी झाली. 14 मार्च रोजी बनसोडे यांनी सोलापुरात येऊन तत्काळ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून भाजपच्या निवडक नेत्यांच्या बैठकाच सुरू आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत नियोजन करणारे भाजपचे किशोर देशपांडे यांच्याकडे पुन्हा नियोजन देण्याची इच्छा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. देशात मोदी लाट असल्याने त्याचा फायदा अँड. बनसोडे यांना होणार आहे. त्या आशेवर अँड. बनसोडे यांचा प्रचाराची भिस्त असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात नागरिकांत काही प्रमाणात नाराजी आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न असल्याचा सूर भाजपमध्ये आहे. पण त्याबाबतचे नियोजन मात्र दिसून येत नाही.
मागील लोकसभा निवडणूक अँड. बनसोडे यांनी लढवली. त्याची तयारी एक वर्ष आधीपासून करण्यात आली होती. सावरकर विचार मंचच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या निवडणुकीनंतर बनसोडे यांचा मतदारसंघात संपर्क राहिला नाही. तसेच, लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे मध्यंतरी जाहीर केले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर बनसोडे पुन्हा ‘यू टर्न’ घेत निवडणूक रिंगणात उतरले.
तयारी नसताना बनसोडे यांना शहरासह ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान आहे. शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सोडला तर भाजपचे अस्तित्व दिसून येत नाही. नरेंद मोदी यांचा करिश्माच भाजपला तारू शकणार आहे. तसेच, गृहमंत्र्यांवरील नाराजांना आकर्षित करणे हेच प्रचाराची मुद्दे असतील.