आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

एक व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी नव्हे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-गेल्या अनेक महिन्यांपासून दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत सुरू असलेली धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अप्रत्यक्षपणे जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांच्यावर टीका करीत एक व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य देण्यासाठी आम्ही स्वतंत्र यंत्रणा राबवू, असा इशारा दिला.
मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे नुकताच काँग्रेसच्या नेत्या उज्ज्वला शिंदे यांचा दौरा झाला. त्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते दूर होते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक होटगी रस्त्यावरील एका हॉटेलच्या सभागृहात झाली. अख्तरताज पाटील, राधाकृष्ण पाटील, संतोष पवार, अशोक करजोळे, दादा कोरे, गुरुनाथ कटारे, आमोगसिद्ध कांबळे, तुळजाराम नरोटे, चंद्रशेखर भरले, सुभाष पवार आदी उपस्थित होते. या वेळी चंद्रशेखर भरले आणि संतोष पवार म्हणाले, ‘एक व्यक्ती म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस नाही. काँग्रेसने सर्व कार्यकर्त्यांना मानाची वागणूक दिली पाहिजे.’ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, ‘नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षाचा बळी देऊ नये.’ गुरुनाथ कटारे आणि अशोक करजोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले आहेत. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.
तालुकाध्यक्ष डॉ. बगले म्हणाले, ‘शरद पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक मतदार सुशीलकुमार शिंदे यांनाच मतदान करेल. त्यासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्वतंत्र प्रचार यंत्रणा न मिळाल्यास कार्यकर्ते तटस्थ राहतील. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मित्रपक्षात फूट पाडण्यासाठी काही लोकांना जवळ तर काहींना दूर करायचे धोरण राबवले आहे. अशा लोकांमुळे शिंदे यांचे मताधिक्य कमी होण्याची भीती आहे.’
..तर तटस्थ राहू
काँग्रेसमध्ये प्रवेश करावा
तालुकाध्यक्ष बगले म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता काही लोक स्वत:हून काँग्रेसला मदत करीत आहेत. अशा लोकांनी सरळ काँग्रेसमध्ये गेल्यास बरे होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी.’
हसापुरेंशी संपर्क नाही
या संदर्भात हसापूरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.