आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

निवडणूक लोकसभेची, परीक्षा विधानसभेची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यात प्रचाराचा धडाका अजून तरी सुरू झाला नाही. पण ही निवडणूक लोकसभेची असली तरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांची शक्तिपरीक्षाच ठरणार आहे. विशेषत: अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, बार्शी, शहर उत्तर या मतदारसंघात त्यादृष्टीने राजकीय धुळवड पाहायला मिळणार आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना असाच सामना होणार आहे. आमदार दिलीप माने यांच्यासाठी ही परीक्षा असली तरी या मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे सुरेश हसापुरे, काँग्रेसचे राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके ही मंडळी काँग्रेससाठीच काम करीत आहे. शिवसेनेकडून माजी आमदार रविकांत पाटील, रतिकांत पाटील आणि शिवशरण पाटील बिराजदार तर भाजपकडून माजी खासदार सुभाष देशमुख हे याच मतदारसंघातून इच्छुक आहेत.
कोठे, चाकोतेही घेणार अंदाज
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. आमदार विजय देशमुख गेल्या दोन निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांना पक्षात प्रतिस्पर्धी नाही. पण काँग्रेसमध्ये मात्र माजी आमदार विश्वनाथ चाकोते व माजी महापौर महेश कोठे यांच्यात विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये 7 हजार मतांचा फरक होता. त्यामुळे हा फरक भरून काढता येतो का? याचा अंदाज चाकोते, कोठे घेत आहेत.
बार्शीत राजेंद्र राऊत यांच्याकडे लक्ष
उस्मानाबादला जोडलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत सोपल यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही पद्मसिंह पाटील यांना पाठबळ दिले होते. पण नंतरच्या निवडणुकीत सोपल आणि राऊत आमने-सामने आले. त्यात सोपल विजयी झाले. आता तर सोपल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपदच दिले आहे. त्यामुळे राऊत विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून या निमित्ताने पुन्हा ताकद आजमावतील; पण कोणाच्या बाजूने हे मात्र गुलदस्त्यात आहे.