आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Aam Adami Party, Divya Marathi, Solapur

अपप्रचारासाठी वृत्तपत्रांतून वाटली गेली आक्षेपार्ह पत्रके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मतदानाला अवघ्या चोवीस तासांचा अवधी उरलेला असताना आम आदमी पार्टीच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके बुधवारी सकाळी स्थानिक वृत्तपत्रांतून वाटून मतदारांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा नोंद झाला. आम आदमी पार्टीचे उमेदवार बाबर यांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकर्‍यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी निराळे वस्ती परिसरातील पक्ष कार्यालयातच उपोषण केले.


चार पुतळा येथे उपोषण करण्यास संमती नसल्याने आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयात बाबर यांनी दुपारी उपोषण सरू केले. यावेळी अँड. खतीब वकील, अँड. गोविंद पाटील, चंदूभाई देढीया, निखिल ठाणेदार, विष्णू पोरे, फडतरे, उत्तम नवगिरे, मकरंद चंदमल, प्रा. उमा बिराजदार, शिवाजी राठोड, हेमंत जाधव, सचिन मस्के, सागर पाटील, प्रभात शिंदे आदींसह आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दोघांना घेतले ताब्यात
धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची फिर्याद अँड. खतीब इज्जतहुसेन यांनी फौजदार चावडी पोलिसात नोंदवली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जाबजबाबाचे काम सुरू होते.


काय आहे आक्षेपार्ह मजकूर
पंढरपूर लोकसभा मतदार संघातून रामदास आठवले निवडून आले, तेव्हा पाच वर्षात 1931 अँट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले. सोलापुरातील नरेंद्र मोदी यांच्या सभेत महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी गळ्यामधील भगवा शेला दोनच मिनिटात काढला आणि निळा ठेवला. त्यांना भगव्याची अँलर्जी आहे का? असे लोक निवडून आले तर सोलापूर हे अँट्रॉसिटीचे शहर म्हणून ओळखले जाईल, असा आरोप वाटण्यात आलेल्या पत्रकात आहे.


काय आहे ‘आप’ची तक्रार
पत्रकावर वसंत त्रिंबक देशपांडे, शंतुनू पांडुरंग कुलकर्णी व इतर समस्त पदाधिकारी, आम आदमी पार्टी, शहर जिल्हा असेही छापील लिहिलेले होते. आम आदमी पक्षाचा या पत्रकाशी काहीही संबंध नाही. परंतु दुसर्‍याच कोणीतरी अशा आशयाचे पत्रक काढून पक्ष व आपली बदनामी केल्याची तक्रार बाबर यांनी केली आहे.


मी कट्टर हिंदुत्ववादी
पत्रकाबाबत मला माहिती नाही. मी कट्टर हिंदुत्व विचारधारा मानणारा माणूस आहे. सावरकर विचार मंचच्या माध्यमातून मी केलेले काम सोलापूरकरांना माहीत आहेच. त्यामुळे भगवा रूमाल काढून टाकण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. अशा पत्रकांवर मतदारांनी विश्वास ठेऊ नये.’’ शरद बनसोडे, भाजप उमेदवार


घृणास्पद प्रकार
‘आप’च्या नावे आक्षेपार्ह आशयाचे पत्रक वाटणे हे घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस तपासात यामागील कटकारस्थान समोर येईल. त्यासाठीच आम्ही उपोषण करत आहोत. जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा हेतू आहे.’’ ललित बाबर, आपचे उमेदवार