आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur, Divya Marathi, Election Expenditure

कोट्यधीश उमेदवारांची खर्चात दिसतेय कंजूषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणूक आयोगाने खर्चाची र्मयादा 70 लाखांपर्यंत वाढविली असली तरी मात्र उमेदवारांकडून प्रचाराचा खर्च दाखवताना काटकसर दिसत आहे. सोलापूर व माढा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून 6 एप्रिलपर्यंत 42 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांचा खर्च 20 लाख तर सुशीलकुमार शिंदे यांचा खर्च 11 लाख 48 हजार आहे. कोट्यधीश असलेल्या उमेदवाराची लाखातील (कागदोपत्री) खर्च पाहून मतदारही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
खर्चात तफावत आढळल्याने नोटिसा दिल्यानंतर प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी तातडीने खर्च दाखविला आहे, तर प्रमुख उमेदवारांनी पथकांनी दाखल केलेला खर्चच अमान्य करीत आव्हान दिले आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांना विचारणा केली होती. शिवाय बनसोडे यांच्यासह इतर उमेदवारांच्या खर्चाकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. त्यामुळे उमेदवार आणि पक्षांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
जाहिरातीमधील छबी व मंडप गायब : कार्यकर्त्यांनी उत्साहाला आवर घाला, कमी खर्च करा, असे आवाहन शिंदे यांनी केल्यानंतर गेल्या चार दिवसांत विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधून शिंदे यांची छबी गायब झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय शिंदे यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली घालण्यात आलेले मंडप तत्काळ काढण्यात आले. दुसरीकडे अपक्ष उमेदवार मात्र निवडणूक खर्चामध्ये कपडे खरेदी, दाढी केलेला खर्च समावेश केल्याचे समोर येत आहे.
सोलापुरातील 10 अपक्षांचा खर्च 1 लाख 88 हजार
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 10 अपक्ष उमेदवारांनी 6 एप्रिलपर्यंत फक्त 1 लाख 88 हजार रुपये खर्च केले आहेत. यामध्ये कृष्णा भिसे यांनी सर्वाधिक 42 हजार तर छाया केवळे यांनी सर्वात कमी 12 हजार 500 रुपये खर्च केले आहेत. शिवाय इतर उमेदवारांचा सरासरी खर्च 15 हजार रुपये आहे. यामध्ये 12 हजार 500 रुपये या अनामत रकमेचा समावेश आहे.
कपडे खरेदी, दाढीचा खर्चही निवडणूक खर्चात सादर
अपक्ष उमेदवारांना निवडणुकीचा खर्च देताना दमछाक होत असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवारांचा किरकोळ खर्च वगळता मोठा खर्च नसल्याचे दिसून आले. माढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भजनलाल निमगावकर यांनी कपडे खरेदीचा खर्च लावला आहे तर सोलापूर मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने दाढीचा खर्च लावला आहे. ‘आप’ने टोपी व चिन्ह झाडूचा खर्च प्रचारात लावला आहे.
एसएमएस, व्हॉइस मेसेजचा खर्च नाही : उमेदवारांकडून सोशल मीडियावरही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये मोबाइलवर मेसेज, व्हॉइस एसएमएसचाही समावेश आहे. मात्र, निवडणुकीच्या खर्चामध्ये याचा समावेश केला नाही. परंतु, यासंबंधी उमेदवारांना विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते.
उमेदवारांचा निवडणूक खर्च
माढा मतदारसंघ : विजयसिंह मोहिते-पाटील 20 लाख 39 हजार 241. सदाभाऊ खोत 4 लाख 54 हजार 181. प्रतापसिंह मोहिते-पाटील 4 लाख 6 हजार 511. कुंदन बनसोडे 4 लाख 89 हजार 238. अँड. सविता शिंदे 59 हजार 901, अँड. सुभाष पाटील 44 हजार 715.
मोदींच्या सभेचा खर्च उमेदवारांवर
भाजपचे उमेदवार शरद बनसोडे व महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेचा खर्च दोन्ही उमेदवारांच्या नावे समान टाकण्यात येणार आहे. मोदी यांच्या सभेचा खर्च अद्याप प्राप्त झाला नसल्याचे निवडणूक खर्च कक्षाचे प्रमुख संजय अनपट यांनी सांगितले.
सोलापूर मतदारसंघ : शरदकुमार बनसोडे : 6 लाख 31 हजार 700. सुशीलकुमार शिंदे : 11 लाख 48 हजार 349. संजीव सदाफुले : 1 लाख 45 हजार 975. ललित बाबर : 2 लाख 14 हजार. पुंडलिक वाघमारे : 42 हजार 280. गौतम सोनकांबळे : 52 हजार 432.