आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur, Political Parties, Divya Marathi

सोलापूरात चौकांत सभांना बंदी; राजकीय पक्षांची गोची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यास शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेकडून देण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या परवाना शुल्कात दुप्पटीने वाढ करण्यात आल्याने प्रचार करणेही महागले आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांची मोठी गोची झाली आहे. याआधी कधीही चौकातील सभांवर बंदी नव्हती आणि निवडणूक काळात परवाना शुल्कही कधी वाढवण्यात आलेले नव्हते.


शहरातील काही चौक गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणूक सभांसाठीच ओळखले जातात. बाळीवेस, जगदंबा चौक, चार हुतात्मा पुतळा चौकासह 12 मुख्य चौकांत आता प्रचार सभा घेण्यावर बंदी आली आहे. जाहीर आणि कॉर्नर सभा घेण्यास काही चौकांत परवानगी देण्यात येऊ नये, असे पत्रच पोलिस प्रशासनाने महापालिकेला दिले. त्यामुळे महापालिकेकडून आता ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे आता सभा घ्यायच्या कोठे असा प्रश्न राजकीय पक्षांपुढे निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रस्त्यावर सभा घेण्यास बंदी आणल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


न्यायालयात जाता येईल
पोलिसांकडे विश्वसनीय माहिती असेल तर त्या आधारावर चौकातील सभांना बंदी आणता येते, अन्यथा नाही. राजकीय पक्षांना सभा घेण्याचा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. ठोस कारण नसताना बंदी आणता येत नाही. तसे केले तर न्यायालयात कोणालाही दाद मागता येतो.’’ अँड. रजाक शेख, कायदेतज्ज्ञ


या असू शकतील पर्यायी जागा
होम मैदान, नॉर्थकोट मैदान, जुळे सोलापुरातील मैदान, पुंजाल मैदान, कुचन प्रशाला, विडी घरकुल पाण्याची टाकी, नेहरू नगर शासकीय मैदानसह सावरकर मैदान, रामवाडी मैदान, सर्व शाळा (शाळेचे वेळ सोडून).

सभेसाठी पर्याय देणे आवश्यक
चौकांतील सभांना बंदी आणली तरी महापालिकेने पर्याय मात्र दिले नाहीत. जगदंबा चौक ऐवजी कॅम्प शाळा, चांदणी चौक ऐवजी रेल्वे मैदान, चार पुतळा ऐवजी नॉर्थकोट मैदान असे पर्याय देणे आवश्यक आहे.


मनपा म्हणते, स्थायी समितीच्या आदेशानुसारच केली दरवाढ
स्थायी समितीने नवीन दरवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. फक्त लोकसभेसाठी ही दरवाढ आहे. त्यात बदल करणे आवश्यक आहे. चौकांत सभा घेण्यास बंदी पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार घालण्यात आली आहे.’’ नमिता दगडे, सहाय्यक आयुक्त, महापालिका


आम्ही बाळीवेस येथे विजयी सभा घेत होतो. यासह मुख्य चौकांत बंदी आणल्याने सभा कोठे घ्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक विविध परवान्यांचे दर वाढवले. निवडणूक खर्चास र्मयादा असल्याने इतर खर्चामध्ये आता कपात करावी लागेल.’’ अनिल कंदलगी, भाजप परवाना विभाग प्रमुख


वाढीव दराबाबत महापालिका आयुक्तांशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने केलेली दरवाढ अनावश्यक आहे. सभेच्या परवान्याबाबत शुक्रवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे.’’ धर्मा भोसले, काँग्रेस शहर अध्यक्ष


दरवाढ मनपाने केल्याने ती कमी करावी म्हणून महापालिका आयुक्तांना निवेदन देणार आहे. सभेच्या ठिकाणांबाबतही त्यात उल्लेख करू.’’ आनंद चंदनशिवे, बसप, निवडणूक प्रचार प्रमुख


निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच दरवाढ जाहीर करणे आवश्यक होते. दरवाढ करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. पण ही दरवाढ कायमस्वरूपी असावी. हा दुजाभाव कशासाठी.’’ अँड. गोविंद पाटील, आप

या चौकांत घेता येणार नाही सभा
सात रस्ता, मौलाली चौक, जगदंबा चौक, बेडर पूल, सिध्दार्थ चौक, चांदणी चौक (फॉरेस्ट), चार पुतळा, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, पांजरपोळ चौक, बाळीवेस, टिळक चौक.


प्रतिदिन नवीन दर रुपयांत (जुने दर)
झेंडे लहान 10 (5), झेंडे मोठे 20 (10), दहा बाय दहा मांडव 100 (50), प्रतिखड्डा 150 (75), दोन बाय 15 बॅनर 60 (30), कमान 300 (150), बॉक्स कमान 500 (250), प्रति चौरस फूट कटआऊट 5 (3), कॉर्नर सभा 5 हजार (3 हजार), जाहीर सभा 7 हजार (5 हजार), मैदान सभा 6 हजार (6 हजार).