आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur, Sushilkumar Shinde, Divya Marathi

अर्ज छाननीवेळी विष्णुपंत कोठे, जयसिंह अन् प्रतापसिंहांचा ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी गुरुवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने विष्णुपंत कोठे, जावई राज र्शॉफ, अँड. सतीश माने-शिंदे, भाजपचे शरदकुमार बनसोडे यांच्या वतीने चन्नवीर चिट्टे, अँड. संतोष नाव्हकर तर विजयसिंह मोहिते यांच्या वतीने जयसिंह मोहिते आणि अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते यांनी जातीने हजेरी लावली. एस.सी.साठी राखीव असलेल्या सोलापूर मतदारसंघातून ओबीसी उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने एकूण 7 जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले.


दोन्ही निवडणूक कार्यालयात सकाळी 10 पासूनच छाननी प्रक्रियेस सुरुवात झाली. सोलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कवडय्या शेखरय्या स्वामी यांनी अर्जासोबत इतर मागास प्रवर्गाचा दाखला जोडला होता, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला. मिलिंद भगवान सिद्धगणेश यांच्या अर्जावर 10 ऐवजी फक्त 9 सूचकांच्या सह्या होत्या, एका सूचकाची सही नव्हती तर संतोष दादासाहेब कसबे-पाटील यांनी अनामत रक्कमच भरली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. अशोक कटके यांनी भाजपचे उमेदवार शरदकुमार बनसोडे यांच्यासाठी पूरक अर्ज भरला होता. मात्र, बनसोडे यांनी 4 अर्ज भरले होते. नियमानुसार चारच अर्ज भरता येत असल्याने कटके यांचा अर्ज बाद झाला. माढा मतदारसंघातून 3 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये नीलेश शिंदे यांनी उमेदवारी अर्जासोबत मतदार यादीत नावे असलेला पुरावा जोडला नव्हता. सुनीता मोहन झेंडे यांनी सूचकांच्या सह्या निवडणूक अधिकार्‍यासमोर न घेता परस्पर घेतल्या होत्या. गजानन पालवे यांनी शपथपत्रातील रकाने रिक्त ठेवले, त्यांना रकाने भरून देण्याविषयी कळवूनही दुर्लक्ष केले. या कारणामुळे त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.


ज्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी पूर्ण होऊन अर्ज मंजूर झाले आहेत ते उमेदवार निवडणूक जिंकल्याच्या अविर्भावात कार्यालयाच्या बाहेर पडत असल्याचे चित्र होते. प्रमोद गायकवाड यांचा अपवाद वगळता कोणीही हरकत घेतली नाही. यावेळी आपचे उमेदवार लक्ष्मण बाबर, अँड. सविता शिंदे, बसपचे अँड. संजीव सदाफुले यांच्यासह अपक्ष उमेदवार उपस्थित होते.


दोन भाऊ एकत्र, पण अबोला
माढा निवडणूक कार्यालयात अर्ज छाननीदरम्यान जयसिंह व प्रतापसिंह हे दोन भाऊ दोन तास एकत्रच होते. शिवाय वैध अर्जांची घोषणा करतेवेळीही एकमेकांशेजारी दोघे बसले. पण दोघांचा अबोला कायम दिसला. दोघांसोबत आलेले कार्यकर्ते मात्र निवडणुकीच्या गप्पात रंगल्याचे दिसून आले. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर प्रतापसिंह कार्यकर्त्यांसोबत बाहेर पडले. त्यानंतर जयसिंह मोहिते निघून गेले.