आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Tenth Board Examination, Solapur

प्रचारसभेमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची अग्नि‘परीक्षा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - निवडणुकीचा गोंगाट काय असतो, याची प्रचीती वर्षभर कठोर मेहनत करून परीक्षा देण्यासाठी आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना (इंग्रजी माध्यम) मंगळवारी आली असावी. हरिभाई देवकरण प्रशालेच्या केंद्रात मराठीचा पेपर देणार्‍या 440 विद्यार्थ्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभेचा प्रचंड गोंधळ सहन करत पेपर सोडवावा लागला.


या सभेला पोलिस आयुक्तांनी परवानगी कशी दिली, सभेचे ठिकाण अगोदरच घोषित झालेले असताना माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची अडचण संबंधितांच्या निदर्शनास का आणली नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्वांवर कडी केली ती शिक्षण विभागाने. मुख्याध्यापकांनी या गोंधळाची माहिती दिल्यानंतर त्यांना खिडक्या बंद करून घ्या, अशी सूचना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांची भाषणे कानावर पडत असतानाच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागले.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, माढा मतदार संघातील विजयसिंह मोहिते यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर होम मैदानावर जाहीर सभा झाली. दोन्ही उमेदवारांसह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. 11 ते 2 या वेळेतील पेपरसाठी 18 खोल्यांमध्ये 440 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. त्याचवेळी कार्यकर्त्यांचे जत्थे होम मैदानाच्या दिशेने निघाले होते. हरिभाई प्रशालेच्या दर्शनी भागापासून साधारणत: 300 ते 400 फुटांवर सभेचे व्यासपीठ होते. मोठे कर्णे व साउंड बॉक्स होते. सभेच्या आगोदर घोषणाबाजी, त्यानंतरच्या भाषणांमुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना त्रास झाला. परीक्षा सुरू असल्याचे भान राजकीय नेत्यांना आणि सभेला परवानगी देणार्‍या यंत्रणेलाही नव्हते. परीक्षा सुरू असताना प्रचारसभेला परवानगी कशी दिली, असा प्रश्न काही पालकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना उपस्थित केला.


..आवाज कमी झाला
सकाळी 11 वाजता पेपर चालू झाला. 12 वाजता प्रचारसभेचा आवाज मोठय़ा प्रमाणावर वाढला. शाळेतील शिपायांना पाठवून शाळेत परीक्षा सुरू असल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर आवाज कमी झाला.- व्ही. एल. नार्वे, मुख्याध्यापक, ह. दे. प्रशाला


अहवाल मागवून घेऊ
परीक्षेदरम्यान अशा प्रकारचा व्यत्यय येणे चुकीचे आहे. मुळात परीक्षा सुरू असताना या ठिकाणी जाहीर सभेला परवानगी कशी दिली, याबाबत वरिष्ठांकडून चौकशी करण्यात येईल. याबाबत अहवाल मागवून पुणे बोर्डाला पाठवून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्रास झाला असेल तर पुणे बोर्डाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. -लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग


पालकांची सूचना आम्ही पाळली
होम मैदानावर सभा घेण्यासाठी महापालिकेची जागेसंदर्भात व बंदोबस्त देण्यासाठी आमची परवानगी घेण्यात आली होती. सभा पूर्वनियोजित होती. स्पीकर लावू नये म्हणून एक पालक व शाळेतील शिक्षकाने पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर अकरा ते एक यावेळेत लाऊडस्पीकर बंद करण्यात आले. त्यांची सूचना आम्ही पाळली. शाळेच्या दिशेने असलेल्या स्पीकरचा आवाज दुपारी एकनंतर कमीच होता. संयोजकांनी परवानगी मागितल्यामुळे आम्ही दिली. रस्ताही वाहतुकीला खुला ठेवला होता. -मोहन शिंदे, पोलिस निरक्षक, सदर बझार ठाणे.


खिडकी बंद करून घ्या..
हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एल. नार्वे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. गोंगाट असेल तर खिडकी बंद करा, अशी सूचना त्यांना देण्यात आली.

वाहतूक कोंडीचा त्रास
* हरिभाई देवकरण प्रशालेत येताना वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर 11 वाजता पेपर सुरू झाला. त्यावेळेपासूनच आवाजाची तीव्रता अधिक होती. पेपर सोडवताना व्यत्यय येत होता. त्रस्त विद्यार्थी
मुलांचे लक्ष विचलित
* प्रचारसभेचा फटका विद्यार्थ्यांना व पालकांनाही सहन करावा लागला. एक तर परीक्षेचे टेन्शन असते. त्यामध्ये या गोंधळामुळे मुलांचे लक्ष विचलित होते. परीक्षा असताना अशा प्रकारच्या सभा घेणे योग्य नाही. एक पालक
लोकशाहीचा अधिकार
* होम मैदानावर जाहीर सभा घेण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखेची परवानगी घेण्यात आली होती. सभेला परवानगी द्यावीच लागते. लोकशाहीत तो सर्वांचा अधिकार आहे. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
पेपर सोडवताना व्यत्यय
* सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाला. त्यावेळी आवाजाची तीव्रता कमी होती. 12 वाजता मात्र आवाजाची तीव्रता मोठय़ा प्रमाणावर वाढली. हा प्रकार 12.30 पर्यंत सुरूच होता. त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाले. माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अशीच अवस्था झाली होती. या त्रासाबद्दल पर्यवेक्षकांना सांगतिले, मात्र त्यांना वर्ग सोडून जाता येत नसल्याने ते हतबल झाले होते. वाहतुकीची कोंडी झाल्याने परीक्षा केंद्रात येतानाही खूप त्रास झाला त्रस्त विद्यार्थिनी