आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

111 जोडप्यांचे झाले शुभमंगल; नऊ वर्षांत बनले 2000 जावई,स्वागतकमानीला दिले इंडिया गेटचे रूपडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- इंडियागेटमधून विशाल प्रांगणात आगमन... समोर भव्य मंच, त्यावर सर्व धर्माची प्रतीके... अनेकविध रंगांचे विद्युत झोत... त्यातून मार्ग काढत १११ जोडपी आली... सफारी वस्त्रांतील वर तर शालूमधल्या वधू या प्रकाशझोतात न्हाऊन गेल्या... गोरज मुहूर्ताची वेळ झाली... अन् त्या जोडप्यांवर मंगल अक्षता टाकणारे लाखो हात उंचावले. लोकमंगलच्या उपक्रमातील हे शुभमंगल होते. लोकमंगल परिवारचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख कन्यादान करून वऱ्हाडींच्या स्वागतासाठी उभे होते. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी हा शानदार सोहळा झाला. आतापर्यंत झालेल्या अशा उपक्रमांतून देशमुख यांना 2000 जावई मिळाल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदा नववे वर्ष होते. सहभागी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. रेशीमगाठी बांधण्यापूर्वीच वधू-वरांची विवाहस्थळापासून वरात काढण्यात आली. गोरज मुहूर्तावर ‘शुभमंगल सावधान...’ म्हटल्यानंतर आतषबाजीने संपूर्ण मैदान उजळून निघाले. विवाह सोहळ्याचे नेटके नियोजन शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांनी पार पाडले.
मुलगी जन्मल्यास नावे हजार ठेव
महाराष्ट्रातअनेक उद्योग आहेत, इंडस्ट्रीज आहेत. त्यांनीही असाच उपक्रम सुरू करावा. केवळ विवाह करून जबाबदारी संपत नाही तर ती सुरू होते, असे मी मानतो. या जोडप्यांना पुढील वैवाहिक आयुष्यातील अडी अडचणी सोडविण्यासाठी लोकमंगल तत्पर असेल. याशिवाय पहिली मुलगी जन्मली तर त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव 18 वर्षांसाठी ठेवण्यात येईल. मुलीच्या जन्माचे स्वागत करावे यासाठी हे प्रोत्साहन असेल.”आमदारसुभाष देशमुख
एकतेचा संदेश देणारे नेपथ्य
हरिभाईदेवकरण प्रशालेचे संपूर्ण मैदान वऱ्हांडीच्या उपस्थितीने भरले होते. स्वागत कमानीला इंडिया गेटची प्रतिकृती उभारण्यात अाली होती. मुख्य व्यासपीठाचे नेपथ्य राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे होते. विविध प्रांतांची वैशिष्ट्ये दर्शवणारी एकात्मता साधणारी मानवी गुंफण आणि फुलांनी सजवलेला भव्य तिरंगा लक्षवेधक होता.
यांचे लाभले आशीर्वाद
गौडगावचेडॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य महास्वामी, माळकवठेचे पंचाचार्य शिवाचार्य महास्वामी यांच्यासह जुगूनू महाराज, अनंत महाराज इंगळे, सुधाकर महाराज इंगळे, अभिमन्यू महाराज इंगळे, दिगंबर महाराज फंड यांचे शुभाशीर्वाद वधू-वरांना लाभले.
नेटके नियोजन
विवाहावेळीतिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. लोकमंगलचे कासव लोकमंगल प्रतिष्ठान ही अक्षरे आकर्षक दारूकामातून झळकली. १११ वधू-वरांनी गोरज मुहूर्तावर आपल्या जोडीदाराला विवाहबंधनात बद्ध केले. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. विवाह विधी पार पाडण्यासाठी प्रत्येक वधू-वरांसमवेत धर्मिक विधी पार पाडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.