आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोचि विठ्ठल, तेचि मागणे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - ‘बा विठ्ठला... राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव. राज्यावर दुष्काळ, भूकंप यासारखी संकटे येऊ देऊ नकोस,’ अशी प्रार्थना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी बुधवारी विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळी केली. कार्तिकी एकादशीनिमित्त बुधवारी पंढरीत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. शासकीय महापूजेचा मान यंदा एरंडोली (ता. मिरज) येथील तुकाराम हरी पाटील (वय 64) आणि त्यांच्या पत्नी जयश्री (वय 55) यांना मिळाला.
कार्तिकी एकादशीनिमित्त बुधवारी पहाटे सोपल यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यांच्या सोबत महापूजेत सहभागी झालेल्या पाटील दांपत्याला प्रथेनुसार वर्षभराचा मोफत एसटी प्रवास पासही मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. महापूजेनंतर मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांच्या हस्ते झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, विधान परिषदेचे आमदार दिपक साळुंखे, आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राणा जगजितसिंह पाटील, उल्हास पवार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मंदिर समितीचे सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, व्यवस्थापक एस. एस. विभुते आदीं उपस्थित होते.
भाविकांची संख्या घटली
मागील यात्रेच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत पन्नास टक्के घट झाल्याचे दिसून आले. वाढती महागाई, लांबलेला पाऊस, शेतीची सध्या सुरू असलेली कामे आदी कारणांमुळे यात्रेत वारक-यांची संख्या कमी झाल्याचे वारक-यांकडून सांगण्यात आले. मात्र भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.