आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम म्हणजे ईश्वरी साक्षात्कार, ईश्वराची निर्व्याज, निरपेक्ष भक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रेम म्हणजे ईश्वरी साक्षात्कार, ईश्वराशी नाते जोडणे होय. या हृदयीचे, त्या हृदयी घातले असा हा संजीवन समृद्ध विषय होय. जगातला खरा ज्ञानी, पंडित तोच जो या प्रेमाची शक्ती समजून घेतो, म्हणून तर संत कबीर आपल्या रोखठोक शब्दांत प्रेमाची महती सांगतात.
‘पोथी पढी पढी, पंडित भया न कोय
ढाई अक्षर प्रेमका, पढं सो पंडित होय.’

अवघ्या अडीच अक्षरांत अखिल ब्रह्मांडला सामावून घेण्याची महत्तम शक्ती या प्रेमात आहे. प्रेम म्हणजे ईश्वराची निर्व्याज, निरुपम, निरपेक्ष भक्ती होय. या संदर्भात मराठीतले ज्येष्ठ, र्शेष्ठ गोविंदाग्रज या कवीची ‘प्रेम’ आणि ‘मरण’ ही प्रासादिक कविता मला आठवते. या कवितेचा मी अत्यंत ऋणी आहे. कारण, या एका कवितेने माझ्यासारख्या तेलुगु माणसाला मराठी कवी या प्रसादरूप माहात्म्यापर्यंत पोहोचवले आहे.

त्या कवितेची अद्भुत पार्श्वभूमी अशी आहे.

एक विशाल अशी भूमी आहे. यात नानाविध झाडे आपापल्या रुंद फ ांद्या पसरून बहरलेली आहेत. याच काळात एक नवा जीव, एक नवे रोपटे अंकूर धरू लागले आहे. या बाळाचं कौतुक आसपासची बुजुर्ग झाडे करू लागतात. दिवसामागून दिवस सरू लागतात. हळूहळू ते रोपटे देखण्या अशा झाडात रूपांतरित होऊ लागते. बुजुर्ग झाडांना या तरुण देखण्या दोन झाडांचे कोण कौतुक. आता तो बहारदार तारुण्याचे मुसमुसलेला तरु झाला आहे. या तरुण झाडाच्या तारुण्याचा दिमाखा सार्‍या आसमंतात कौतुकाचा विषय झालेला आहे. अशा वेळी, एकेदिवशी आकाशात निळे निळे गच्च ढग जमू लागतात. मेघराजाची दुमदुमणारी गर्जना अवघे आकाश दुमदुमून टाकते आणि याच वेळी सौदामिनी, विजेची रेघ आकाशमंचकी थिरकून जावी, सारा भूप्रदेश क्षणात हरवला जातो, त्या दिव्य तेजाने तो तरुण, देखणा तरू मोहरून जातो. आकाशातल्या त्या दिव्य वीजबालेच्या प्रेमात तो पडतो. ही अशी विद्युत बाला मला प्रेयसी म्हणून हवी आहे, म्हणत तो तिची आराधना करू लागतो. त्या तरुणाचे हे वेड, प्रेम पाहून ती बुजुर्ग झाडे गोंधळून जातात. त्याची समजूत घालू लागतात. वेड्या बाळा, तिचा नाद सोडून दे, ती वीज आहे, तिच्या प्रेमात पडणे धोक्याचे आहे. पण, प्रेमाने झपाटलेला तरू त्यांचे थोडेच ऐकणार? आकाशातल्या त्या अपरूप मदनमस्त तेजस्वी प्रेयसीच्या प्राप्तीसाठी तो तरू झुरू लागतो, देवाची तपश्चर्या करू लागतो. दिवस, महिने, वष्रे सरतात आणि एकेदिवशी तो करुणामय परमेश्वर प्रसन्न होतो आणि अनिमिष नेत्रांनी त्या तरुण झाडाकडे पाहात म्हणतो ‘बोल वत्सा, काय हवंय तुला’? तो तरुण तरू म्हणतो, ‘देवा, मला ती आकाशातली विद्युत बाला हवी आहे, ती माझी प्रेयसी आहे, तिच्यावर माझे आतोनात प्रेम आहे, मला ती मिळवून द्या.’ हे ऐकून देव थक्क होतो. त्याची समजूत घालत म्हणतो, बाळा, ती वीज आहे, तिच्या स्पर्शाने तू जळून जाशील. त्या पेक्षा मी तुला स्वर्गात नेतो, तुला चिरंजीवा देतो, तिचा नाद सोड.

प्रेम म्हणजे ईश्वरी साक्षात्कार, ईश्वराची निर्व्याज, निरपेक्ष भक्ती तेव्हा तो तरु म्हणतो,

‘निष्प्रेम चिरंजीवन ते
जगी दगडालाही मिळते
क्षण एक पुरे प्रेमाचा
वर्षाव पडो मरणाचा’

प्रेयसीच्या स्पर्शासाठी आतुरलेला तो तरुण काही केल्या ऐकत नाही. हे पाहून देव शेवटी नाईलाजाने त्याच्या विद्युतमयी, तेजस्वी प्रेयसीला त्याच्या भेटीसाठी पाठवतो. या वेळची गोविंदाग्रजांची कविता अद्भूत रूप धारण करते. या वेळचे शब्द अजूनही अंगावर शहारे आणतात. विद्युतबाला तरुण, देखण्या प्रियकराकडे आकाशातून चपळ चतुर वेगाने उसळत येते आहे आणि तो तरु आपले रुंद रुंद बाहू पसरून, तिला घेण्यास उत्सुक झाला आहे. आणि एकदाचे त्यांचे मिलन झाले. यावेळी कवी म्हणतो, ‘कडकडे, स्पर्श जो घडे,’

‘वृक्ष उन्मळलला
परि पडता पडता हसला
हा योग, खरा हटयोग
प्रीतीचा रोग, लावला ज्याला
लाभते मरण, त्याला हे असे’

इष्काचा जहरी प्याला, अत्यानंदाने पिणारा तो वृक्ष, ती प्रेयसी, ते प्रेम सारे काही अद्भूत. प्रेमासाठी प्राण द्यावा लागतो. प्रेम म्हणजे शारीरिक वासना नव्हे, ती एक ईश्वरदत्त आत्मीय ओढ आहे. तो एक परमेश्वराचा परम पावन साक्षात्कार आहे.

याला म्हणतात प्रेम. ज्याला हे असे प्रेम लाभते, तो धन्य धन्य होय. म्हणून म्हणतो प्रेम करायचे असेल तर त्या वृक्षाप्रमाणे करा, नाही तर त्याच्या वाटेला जाऊ नका. ईश्वरदत्त प्रेमाची बदनामी करू नका, नशिबाने इश्काचा जहरी प्याला हाती आला, तर तो आनंदाचे ओठी लावा. कारण प्रेम पवित्र आहे, उदार आहे, ईश्वरी साक्षात्कार आहे. अस्तु.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)