आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madha Lok Sabha Constituncy News In Marathi, Vijaysinh Mohite, Divya Marathi

पारंपरिक विरोधकही उतरले प्रचारात; आमदार शिंदे, भालके, जगताप, शहाजीबापू सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या अनेक वर्षांत व्यक्तिगत आणि पक्षीय पातळीवर विजयसिंह मोहिते यांच्या विरोधात असलेले आमदार बबनराव शिंदे, भारत भालके आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील, जयवंतराव जगताप आदी मंडळी आता माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली आहेत.मोहिते आणि आमदार शिंदे यांच्यातील राजकीय मतभेदामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी झाली. काही लोकांनी त्याला शरद पवार विरुध्द अजित पवार गट अशीही फोडणी दिली.

राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आमदार शिंदे आणि माढा पंचायत समितीचे सभापती रणजितसिंह शिंदे हे पिता-पुत्र मोहितेंच्या प्रचारात सक्रिय आहेत. शिवाय काही काळ कुरबुरी करणार्‍या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांनी कामाला लावले आहे. मात्र, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे प्रचारात सक्रिय नाहीत, त्यासंदर्भात आमदार शिंदे यांनी संयमी शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.


सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि मोहिते यांनी अनेक वर्षे एकमेकांवर कुरघोड्या केल्या. विजयसिंहांनी अनेकवेळा आमदार गणपतराव देशमुख आणि आमदार दीपक साळुंखे यांच्या बाजूने कौल दिला. सत्तेतून बाजूला राहिल्यानंतर मोहितेंनी पुन्हा शहाजीबापूंशी जुळवून घेतले. त्यामुळे शहाजीबापू विजयसिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात सहभागी आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासंदर्भात काही वेळा तक्रारी केल्या, पण त्याही बापूंनी बाजूला ठेवल्या आहेत.


करमाळ्याच्या राजकारणात जगताप विरुध्द मोहिते असा वाद अनेक वर्षे रंगला. बागल गटासोबत बिनसल्यानंतर मोहितेंनी जगताप यांच्यासोबतचे संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला. जयवंतराव जगताप यांनी विजयसिहांची यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. प्रतापसिंहांनी, ‘आमचे बंधू म्हणजे पवारांच्या सर्कशीतील सिंह आहेत’ असा आरोप केला होता. त्याला मोहिते बंधूंनी उत्तर देणे अपेक्षित होते, परंतु हे काम जयवंतराव जगताप यांनी केले. ‘सर्कशीतील सिंह हा माणसाळलेला असतो, जंगलातल्या सिंहांचा काही नेम नसतो’ या जगतापांच्या प्रत्युत्तराने शरद पवारही खळखळून हसले. आमदार भारत भालके यांच्याकडूनच विजयसिंहांचा पराभव झाला. त्यामुळे माजी आमदार सुधारक परिचारक, प्रशांत परिचारक मोहितेंपासून दूर गेले. नंतर मोहितेंनी भालके यांच्यासोबत सलगी केली. त्यामुळे आमदार भालके स्वत:हून विजयसिंहांच्या प्रचारात उतरले. परिचारक यांचा रुसवा काढण्यासाठी मोहितेंना परिश्रम घ्यावे लागले, पण आमदार भालके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन प्रचार यंत्रणा कामाला लावली.


आघाडीचा धर्म पाळण्यासाठीच
सांगोल्याच्या राजकारणात आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबत व्यक्तिगत मतभेद होते. मात्र, विजयसिंहांसोबत मतभेद असण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांचा स्थानिक राजकारणावर आक्षेप आहे. आम्ही आघाडीचा धर्म म्हणून मोहितेंच्या प्रचारात सक्रिय आहोत. त्यांना मताधिक्क्य मिळवून देऊ.’’ शहाजीबापू पाटील, माजी आमदार, सांगोला

शरद पवारांचा आदेश आणि मोहितेंचे काम
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलेला आदेश आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी गेल्या 25 वर्षांत केलेले काम यामुळेच मी प्रचारात सक्रिय आहे. पवारांनी माढा लोकसभा मतदार संघात भरीव काम केले आहे. ते सर्वसामान्य शेतकर्‍यांना निश्चितच माहीत आहे. शेतकरी संघटनेची टीका बिनबुडाची आहे.’’ बबनराव शिंदे, आमदार, माढा