आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madha, Vijaysingh Mohitepatil And Sadabhau Khot News In Marathi

शरद पवारांच्या प्रतिष्ठेसाठी मोहितेंची लढाई; ‘स्वाभिमानी’चे खोत ऊस दर मुद्दा पेटवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्रातील बडे प्रस्थ, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष नेते शरद पवार यांनी आपला गतवेळच्या माढा मतदारसंघाचा ‘वारसा’ यंदा आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सोपवला आहे. दुसरीकडे, ऊस दरवाढ आंदोलनाचे रान पेटवणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांच्या रूपाने आक्रमक उमेदवार देऊन थेट पवारांनाच आव्हान दिले आहे. दुसरीकडे, स्वपक्षीयांची नाराजी, बंधू प्रतापसिंह यांच्या बंडखोरीचे आव्हान पेलून विजयसिंहांना सदाभाऊंशी ‘फाइट’ करावी लागणार आहे. मुळातच या मतदारसंघात केवळ मोहितेंचीच नव्हे, तर पवारांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, पंढरपूर, सांगोला, माण, फलटण, खटाव तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे साखर कारखान्यांचे जाळे आहे. गेल्या निवडणुकीत सर्व नेते पवारांसाठी झटल्याने त्यांना 3 लाखांचे विक्रमी मताधिक्य मिळाले. आता पवारांनी हा मतदारसंघ सोडला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी या जागेवर दावा केला होता. मात्र, मोहितेंना उमेदवारी मिळाल्याने नाराज नेत्यांमध्ये धुसफूस वाढली आहे, तर दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत ऊस दरासाठी आंदोलने करणार्‍या स्वाभिमानी संघटनेला ऊस उत्पादकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांचेही पाठबळ आहे. याच बळावर महायुतीच्या नेत्यांशी भांडून राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ खोत यांना मिळवून दिला आहे.

विजयसिंह हेही सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ. उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले मोहिते मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मात्र पक्षातून बाजूला गेले होते. मात्र, आता राष्ट्रवादीने विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन केले असून आता त्यांची ‘दिल्ली’ला जाण्याची तयारी आहे.

स्थानिक नेत्यांचा विरोध
विजयसिंहांच्या उमेदवारीला काही जणांचा विरोध होता, परंतु पवारांनी तो एकहाती बाजूला ठेवला. आता पवारांची प्रतिष्ठा जपण्यासाठी नाराजांनाही काम करावे लागेल. दुसरीकडे विजयसिंहांनी सर्वच गटातटांना सोबत घेतले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनीही कॉँग्रेस नेत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. दोन्ही कॉँग्रेसच्या बळावर मोहिते विजयाचा दावा करत आहेत.

ऊस दराचा मुद्दा ‘कॅश’ करणार
सदाभाऊ खोत यांनी वर्षभरापासूनच तयारी सुरू केली होती. ऊस दर आंदोलनामुळे त्यांनी अनेक गावांत कार्यकर्ते जोडले आहेत. राजू शेट्टी, खोत यांची आक्रमक भाषणे हेच महायुतीचे बलस्थान आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखानदारांनी उसाला अपेक्षित भाव देण्यास उशीर लावला. त्याचे भांडवल करण्याची आयती संधी खोत यांना मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांचे समर्थन मिळवण्यासाठीही ते धडपड करीत आहेत. ऊस दराच्या प्रश्नाचे खोत यांच्याकडून प्रचारात भांडवल केले जाणार असले तरी हा मुद्दा कितपत टिकेल याबाबत शंका आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकर्‍याना अपेक्षित दर दिला आहे.

बंडखोरांची कटकट
विजयसिंहांचे बंधू प्रतापसिंहही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास विजयसिंहांच्या मतदानामध्ये विभागणी होईल. माण, फलटणमधून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत. याचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. हा धोका ओळखून निंबाळकरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

विजयसिंहांची बलस्थाने : वजनदार नेता. मंत्रिपदाच्या काळात बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन खात्याचा जादा निधी खेचून आणला. सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे जाळे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी चालवलेली मोहीम.

उणिवा : संयमी भाषणे. शरद पवारांवर अवलंबून, राष्ट्रवादीच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांची नाराजी. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून होणार्‍या आक्रमक भाषणांना प्रत्युत्तर न दिल्यास फटका बसण्याची शक्यता. घरातूनच बंडखोरी.

सदाभाऊंची बलस्थाने : आक्रमक वक्तृत्व, शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट करून टाळ्या मिळवण्याचे अनोखे कसब, ऊस दरवाढ आंदोलनाच्या दौर्‍यामुळे शेतकर्‍याशी थेट संपर्क, राष्ट्रवादीचे नाराज नेते, पदाधिकार्‍याशी जवळीक.
उणिवा : परका उमेदवार अशी चर्चा. केवळ ऊस दरवाढ या एकाच विषयावर मिळालेली प्रसिद्धी. सांगोला, माण, खटाव या भागात तुटपुंजे नेटवर्क. भाजप, शिवसेना नेत्यांचे सर्वसाधारण संघटन आणि त्यांच्याकडून मोठी मदतीची अपेक्षापूर्ती होण्याबाबत शंका.