आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra CM Prithviraj Chavan Calls Narendra Modi A \'dictator\'

भाजपला हवीय हुकूमशाही; शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘भारतात लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. भाजप मात्र लोकशाही धुडकावून हुकूमशाही पद्धती आणू पाहत आहे. महाराष्ट्राला मदत करणार्‍या गुजरातमधील कंपनीवर मोदी खटला भरतात. शेजारी राज्याला मदत करू देत नाहीत, असे लोक देशाचा कारभार कसा करणार?’ असा सवाल करीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला, तर देशात निर्माण केली जाणारी मोदी लाट हा भास असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी अनुक्रमे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी पवार व चव्हाण यांच्यासह दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. ‘गुजरात दंगलीत ज्या मुस्लिम खासदाराला जाळून मारण्यात आले, या कुटुंबाला भेटावे असेही मोदींना वाटले नाही,’ असा घणाघाती हल्लाही पवारांनी केला. शिंदे आणि मोहिते मात्र गरिबांसाठी काम करीत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘नारळ’ : सोलापूरात मंगळवारी कॉँग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त सभा झाली. प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘नारळ’ देत भविष्यातील राजकारणाचे संकेतही दिले.

दोन्ही काँग्रेसचे मनोमिलन
पृथ्वीराज चव्हाण यांनी तर मोदींना कधीही आणि कुठेही आमने-सामने येण्याचे आव्हान देत गुजरात व महाराष्ट्राच्या विकासाबाबत जाहीर चर्चेची तयारी दर्शवली. ‘सध्या परदेशी कंपन्यांना हाताशी धरून आपलीच सत्ता येणार असा आभास निर्माण केला जात आहे. केवळ मार्केटिंग केले जात आहे. मोदींनी वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारत आपल्या पक्षातही एकाधिकारशाही चालविली. त्यांचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही. 1999ची निवडणूक आघाडी करून आम्ही लढविली, आत्ताही दोन्ही पक्ष एकदिलाने काम करून निवडणूक लढवत आहेत, आम्ही नुसतेच एकत्रित नाहीत तर मनोमिलन झाले आहे,’ असा दावाही चव्हाण यांनी केला.