आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - पथकर, प्रवाशांना दिल्या जाणार्या विविध सवलती यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीला दरवर्षी जवळपास 506 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. एसटीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाला दररोज एक लाख लिटर डिझेलची आवश्यकता असते. डिझेलवर दरवर्षी एसटीचे 2400 कोटी रुपये खर्च होतात. राज्यात 567 बसस्थानके, 248 आगार आहेत. दररोज जवळपास 17 हजार बस धावतात. यासाठी एसटीला दरवर्षी 40 कोटी लिटर डिझेल लागते. नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटी मेटाकुटीला आले आहे.
अध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांची भेट
एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डिझेल दरवाढीमुळे होणारा एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच या बाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे गोरे यांनी सांगितले.
केरळच्या धर्तीवर
डिझेल दरवाढीचा फटका केरळ राज्य परिवहन महामंडळलाही बसत आहे. केरळ सरकारने एसटीला वाचवण्यासाठी अनुदान देण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रातही असे होणे गरजेचे आहे.
निर्णय लवकरच होईल
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून अनुदान देण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे.’’ जीवनराव गोरे, अध्यक्ष, एसटी महामंडळ
वीरप्पा मोईलींना भेटणार
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी मोईली यांच्याकडे केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.