सोलापूर - वीजवितरण कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने नोव्हेंबर अखेरपर्यंत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अनंतराव मोडक यांनी दिली. प्रत्येक कामगाराला कामाप्रमाणे वेतन मिळावे, पगाराची स्लिप मिळावी, दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत चेकने पगार मिळावा, भविष्य निर्वाह निधीची स्लिप मिळावी, नियमाप्रमाणे हजेरी पुस्तक ठेवावे, पगार ठेकेदाराच्या घरी वाटप होऊ नये, २४० दिवस भरलेल्या कामगाराला कामावरून कमी करण्यात येऊ नये, मुंबई येथील मुख्य कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी तंतोतंत व्हावी आदी मागण्या आहेत.