आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळमधील मतदारांची नावे दक्षिणमध्ये घुसवल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माहोळ विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावातील मतदारांची नावे सोलापूर दक्षिण मतदारसंघात घुसवण्यात आली असून, प्राथमिक तपासणी अशा प्रकारची १७०० नावे निष्पन्न झाल्याचा दावा दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, याप्रकरणी दोषी असण्यावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मोहोळ विधानसभा मतदार संघात नाव असताना दक्षिण सोलापूरमध्ये नाव नोंदणी करण्यात आलेली आहे. ठरवून याप्रकरची घुसखोरी करण्यात आलेली आहे. पण, ही नावे नांेदवताना एकच पत्ता देण्यात आलेला आहे. यामध्ये सोसायटी सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बोगस पत्ते घेऊन नाव नोंदवणाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, अशी आपली मागणी असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मार्डीचा मतदार दक्षिणमध्ये कसा?
मोहोळ विधानसभा मतदार संघात उत्तर सोलापुरातील मार्डी गावाचा समावेश आहे. मार्डी येथील उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा बाबासाहेब पाटील यांचे नाव दक्षिण सोलापूर मतदार संघात आले आहे. मार्डीचे मतदार असणाऱ्या पाटील यांचा पत्ता उत्कर्षनगर झोपडपट्टी असा दाखवण्यात आला आहे. सभापतींचे नाव दोन मतदारसंघात कसे आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शासकीय पुरावा ग्राह्य धरावा
मतदारांना नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा अावश्यक आहे. बँकेच्या पासबुकाच्या आधारावर नावे घुसवण्यात आल्याची शक्यता आहे. त्यासाठी शासकीय पुरावा ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात येणार आहे, असे शहाजी पवार यांनी सांगितले.

या गावातील नावे दक्षिणमध्ये
मार्डी (२२२), नरोटेवाडी (११२), अकोलेकाटी (७७), होनसळ (१९), डोणज (८०), रानमसले (५६), गुळवंची (८०), गावंडी दारफळ (११८), एकरूक (१६), कारंबा (८), राळेरास (१२०)

सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही बसवा
दक्षिणमधील सर्वच मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करून तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत. मतदान करतानाचे व्हिडिओ चित्रण करावे, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

न्यायालयात दाद मागू
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार केली आहे. यावर समाधानकारक उत्तर नाही मिळाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू.''
शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष भाजपा