आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात हजारपेक्षा जास्त जणांनी नाकारले अनुदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील एक हजारपेक्षा जास्त सधन कुटुंबीयांनी घरगुती गॅसवरील अनुदान नाकारले आहे. तसा अर्ज त्यांनी भरून दिला आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या गॅस विकणार्‍या कंपन्यांच्या एजन्सीकडे याची नोंद झाली आहे. अनुदान नाकारणार्‍यांची राज्यातील संख्या ४७ हजारांवर गेली आहे.

सधन कुटुंबीयांनी अनुदान नाकारून मूळ किमतीत गॅस खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तशी योजना सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइनही अर्ज भरण्याची सोय आहे. प्रतिसाद देणार्‍यांमध्ये सरकारी अधिकार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. हा आकडा आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक ए. डी. फिरोज यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आवाहनामुळे सरकारी अधिकार्‍यांनी अनुदान नाकारले आहे.

यादी वेबसाइटवर
गॅसअनुदान नाकारलेल्या सर्व गॅस ग्राहकांची यादी कंपनीने ईभारत गॅस या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. यादीनुसार पुणे, मुंबई या मेट्रो शहरातील सर्वाधिक ग्राहकांनी गॅस अनुदान नाकारले आहे, त्याखालोखाल, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचा क्रमांक लागतो. अनेक शहरांमध्ये ही संख्या ५० ते १०० वर असल्याचे दिसून येते.

अशी आहे प्रक्रिया
गॅसवरमिळणारे अनुदान नाकारण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे अर्ज उपलब्ध आहे. या अर्जावर आपला ग्राहक क्रमांक नाव लिहून सही करायची आहे. किंवा साध्या कागदावर नाव, ग्राहक क्रमांक मोबाइल क्रमांक नमूद करून मला गॅसवरील अनुदान नको, असे लिहून गॅस एजन्सीकडे जमा केल्यास विनंती मान्य होऊ शकते.

जिल्ह्यात ७५ हजार ग्राहक
जिल्ह्यातलाखांच्या आसपास गॅस ग्राहक आहेत. यामध्ये ज्यांना अनुदानाची गरज नाही किंवा ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे, असे ७० ते ७५ हजार ग्राहक आहेत. गेल्या महिनाभरात हजारापेक्षा अधिक जणांनी आम्हाला गॅस अनुदान नको, असल्याचे कळवले आहे. येत्या काळात यामध्ये वाढ होण्याची शक्यता विक्री व्यवस्थापक ए. डी. फिरोज यांनी व्यक्त केली.

अधिकार्‍यांनी सहभागी व्हावे
महसूलसह इतर शासकीय सेवेत असलेल्या अधिकार्‍यांनी गॅस खरेदीवर मिळणारे अनुदान नाकारावे. यासाठीचा अर्ज संबंधित एजन्सीकडे भरून द्यावा. या मोहिमेत अधिकाधिक अधिकारी यांनी सहभाग नोंदवावा.” तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी