आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरफार उतार्‍यावर 2007 पासूनच्या नोंदीच नाहीत !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर तलाठी कार्यालयातील दफ्तर तपासणीमध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. 2007 ते 2012 पर्यंतच्या फेरफार (6 ड) उतार्‍यावरील 3 हजार 282 तर सात-बारा उतार्‍यावरील 5 हजार नोंदी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. आणखी दफ्तरची तपासणी करणे शिल्लक असल्याने शहर तलाठी कार्यालयाबरोबरच बाळे व कोंडी येथील तलाठी कार्यालय सोमवारी सील करण्यात आले आहे. दफ्तर तपासणी कार्यालयानंतर तीनपेक्षा अधिक मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.


शनिवारी शहरातील एका नागरिकाकडून गेल्या 6 महिन्यांपासून उतारा देत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्याकडे आली होती. त्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी गेडाम यांनी अधिक चौकशी केली असता उतार्‍यावर नोंदीच दिसून आली नसल्याचे समोर आले. त्यानुसार गेडाम यांनी शहर तलाठी कार्यालयातील दफ्तराची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी व रविवारी उपविभागीय अधिकारी शहाजी पवार, तहसीलदार अंजली मरोड व शिल्पा ठोकडे यांनी दफ्तर तपासणी केली. तपासणीमध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सोमवारपर्यंत शहर हद्दीतील केगाव, कोंडी, बाळे, शिवाजीनगर, खेड, सलगरवस्ती, नेहरूनगर, मजरेवाडी, कसबे सोलापूर भागातील उतार्‍यांची तपासणी झाली.
तपासणीमध्ये 3 हजार 282 फेरफार उतार्‍यावरील नोंदी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मंडलाधिकारी प्रवीण घम यांच्याकडे 2 हजार 170, शाकीर सय्यद यांच्याकडील 750 तर संजय गुडनाळे व राजू दुलंगे यांच्याकडे 200 नोंदी प्रलंबित असल्याचे दिसून आले. याशिवाय वरील परिसरातील तलाठय़ांकडील 5 हजार नोंदी ओढल्या नसल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले. मंडलाधिकारी व तलाठी यांनी उतार्‍यावरील नोंदी न ओढल्याने जमीन खरेदी-विक्री बोगस झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


मंडलाधिकारी, तलाठय़ांची दफ्तर तपासणी
जिल्हाधिकारी प्रमुख असल्याने त्यांना महसूलच्या सर्वच विभागाचे दफ्तर तपासणीचे अधिकार आहेत. कर्मचारी संघटनेच्या बैठकीत त्यांच्या संघटनेने प्रलंबित नोंदी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2013 ची मुदत मागितली होती. तरीही जिल्हाधिकारी गेडाम यांनी जानेवारी 2014 पर्यंत मुदतवाढ दिली. फेब्रुवारीमध्ये दफ्तर तपासणी सुरू केली होती. साधारणत: आता जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडलाधिकार्‍यांची दफ्तर तपासणी हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.


मंडलाधिकारी प्रवीण घम निलंबित ?
महसूल कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष मंडलाधिकारी प्रवीण घम यांच्याकडील सर्वाधिक 2 हजार 172 नोंदी प्रलंबित असल्याचे तपासणीमध्ये समोर आल्याने त्यांना निलंबित केल्याची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकारी गेडाम यांनी संपूर्ण तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.


तपासणीनंतर कारवाई होईल
शहराच्या तलाठी कार्यालयाबरोबरच कोंडी आणि बाळे येथील तलाठी कार्यालयही तपासणीसाठी सील केले आहे. उपविभागीय अधिकार्‍यांकडून तीनही कार्यालयातील दफ्तर तपासणी सुरू आहे. संपूर्ण तपासणी अहवाल आल्यानंतर कोणत्या कर्मचार्‍यांकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, हे स्पष्ट होईल. त्यानुसार संबंधित कर्मचार्‍यांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.’’ डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी