सोलापूर - सोलापूर बाजार समितीचे विद्यमान सभापती राजशेखर शिवदारे यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप माने यांच्यासह १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी जिल्हाधिकारी यांनी शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता विशेष बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे सभापती शिवदारे यांनी बुधवारी
आपले मौन सोडले. सभापतिपदी कोण, याचा निर्णय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेच घेणार असल्याचे सांगितल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रीय मंत्री शिंदे मंगळवारपासून चार दिवस सोलापुरात आहेत. याबाबत मंगळवारी रात्रीच बाजार समिती सभापतिपदाबाबत घडलेल्या घटनेची माहिती कार्यकर्त्यांनी पुरवली. यावर श्री. शिंदे यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य केले नाही. यामुळे माजी आमदार दिलीप माने यांचा डाव पलटवण्यासाठी शिंदे कोणती खेळी खेळणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरणार आहे.
माजी आमदार दिलीप माने यांनी स्वत: उर्वरित दोन वर्षांसाठी शिवदारे यांना सभापतिपदाची संधी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवानंतर त्यांची महत्त्वाकांक्षा पुन्हा जागली अशी चर्चा आहे. बाजार समितीतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अविश्वास ठराव आणल्याचे माने यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
ज्यांनी पद दिले त्यांनीच कारस्थानही केले
ज्यांनी मला सभापतिपदी बसवले त्यांच्याकडूनच हे कारस्थान रचले गेले आहे. मात्र, याबाबत मी अधिक बोलणार नाही. अविश्वास ठरावामागे कोण आहेत, त्याची कारणे काय आदीबाबतही मी बोलणार नाही. सभापतिपदी कोण याविषयी श्रेष्ठी सुशीलकुमार शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजशेखरशिवदारे, सभापती, सोलापूर बाजार समिती
राजकारण खालच्या पातळीवरचे
वाढदिवसादिवशीचअविश्वास ठराव दाखल करण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण झाले आहे. दुसरीकडे शिवदारे यांनी त्याच दिवशी बाजार समितीची गाडी कार्यालयाकडे त्वरित परत केली. हे त्यांच्या नैतिकतेचे उदाहरण आहे. व्यक्तिगत द्वेषातून वाढदिवसादिवशीच अविश्वास ठराव आणून चांगल्या संस्थेच्या कारभाराबाबत चुकीचे कृत्य केले गेले आहे. चनगोंडप्पाहविनाळे, माजी सभापती